ब्रेकिंगमहाराष्ट्र
सावंत-पाटील आमनेसामने; धाराशिव झेडपी अध्यक्षपदावर कोणाची मोहर? आज लागणार निकाल!
महायुतीतच चुरस वाढली; सेना की भाजप – जिल्ह्याचे लक्ष आजच्या निवडीकडे

0
7
6
5
0
5
सावंत-पाटील आमनेसामने; धाराशिव झेडपी अध्यक्षपदावर कोणाची मोहर? आज लागणार निकाल!
महायुतीतच चुरस वाढली; सेना की भाजप – जिल्ह्याचे लक्ष आजच्या निवडीकडे
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन महिना लोटत आला आहे. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी त्यातील कोणत्याही एका पक्षाला स्वतंत्रपणे बहुमत नाही. त्यामुळे युतीमधील शिवसेना आणि भाजपा यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या पत्रकार परिषदांमधून तसेच सोशल मीडियावरील चर्चेतून हा वाद अधिक स्पष्ट होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नेमका कोणत्या पक्षाचा होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया शुक्रवारी (दि.१३) पार पडत असून दुपारनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. अध्यक्षपदासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेवर चर्चा सुरू असून भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे आपापल्या पक्षासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अध्यक्षपदाबाबत सस्पेन्स कायम असून महायुतीत सेना की भाजपा बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ जिल्हा परिषद गटांतील व ११० गणांतील सदस्यांच्या निवडणुकीचा निकाल मागील महिन्यात जाहीर झाला. या निवडणुकीत जवळपास सर्वच तालुक्यांत महायुतीने बाजी मारली. त्यानंतर पंचायत समिती सभापती निवडीही जाहीर झाल्या असून त्यामध्ये सर्वाधिक सभापती पदे शिवसेनेच्या वाट्याला गेली आहेत.
यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच शिवसेनेच्या नेत्यांची आलेली वक्तव्ये राजकीय गोंधळ वाढवणारी ठरत आहेत. शिवसेनेतील दोन्ही गटांचे नेते एकत्र येत अध्यक्षपदावर दावा करत असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीतच अध्यक्षपदावरून चलबिचल पाहायला मिळत आहे.दरम्यान दोन्ही पक्षांकडून अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. भाजपाकडे बहुमत होईल असे संख्याबळ असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडे ठोस बहुमत आहे का, याबाबतही चर्चा सुरू आहे. काही सदस्य ऐनवेळी कोणती भूमिका घेतील, याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.मागील महिन्यापासून सदस्य सहलीवर गेल्यापासून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या सर्व चर्चेला शुक्रवार म्हणजेच आज दुपारपर्यंत पूर्णविराम मिळणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0
7
6
5
0
5



