राष्ट्रवादी काँग्रेसकडून कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना मोठी जबाबदारी; दहा ते बारा ऑक्टोबर दरम्यान धाराशिव, सोलापूर, जालना व वाशिम जिल्ह्यात पक्ष संघटनेच्या आढावा बैठका
धाराशिव नगरपरिषद निवडणूक; ॲड.सौ.मंजूषा साखरे यांना हिरवा कंदील
राष्ट्रवादी काँग्रेसकडून कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना मोठी जबाबदारी!

१० ते १८ ऑक्टोबर दरम्यान धाराशिव, सोलापूर, जालना व वाशिम जिल्ह्यात पक्ष संघटनेच्या आढावा बैठका
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी कृषीमंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांना पक्ष संघटनेच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि धाराशिव, सोलापूर तसेच जालना या जिल्ह्यांचे संपर्कमंत्री म्हणून मंत्री दत्तात्रय भरणे यांना जिल्हानिहाय आढावा बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिलेल्या पत्रानुसार, १० ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मंत्री भरणे यांनी संबंधित जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय पक्ष संघटनेच्या बैठका घेऊन आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखावी. या बैठकींना जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, आजी-माजी आमदार-खासदार, फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या आढावा बैठकींचा उद्देश आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त यश मिळविणे हा आहे. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी जिल्हानिहाय समन्वय साधत निवडणूक नियोजनावर भर देण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. मंत्री भरणे यांनी घेतलेल्या सर्व बैठकांचा अहवाल थेट प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या नावे पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पत्राच्या प्रती व कार्यवाहीसाठी वाशीम जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत ठाकरे, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पवार, जालना ग्रामीणचे श्री. अरविंद चव्हाण, धाराशिवचे श्री. महेंद्र धुरगुडे, सोलापूर ग्रामीणचे श्री. उमेश पाटील व जालना शहराचे श्री. अब्दुल रशीद यांना पाठविण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे आयोजन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

धाराशिव नगरपरिषद निवडणूक; ॲड.सौ.मंजूषा साखरे यांना हिरवा कंदील
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर स्वतः अजितदादांचे विशेष लक्ष असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी ते सक्रिय झाले आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ॲड. सौ. मंजूषा विशाल साखरे यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ॲड. विशाल साखरे हे सध्या जिल्हा प्रवक्ते म्हणून कार्यरत असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या अर्धांगिनी यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्याचा विचार केल्याची माहिती मिळते. या निर्णयामुळे धाराशिव शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




