सप्टेंबरमधील अतिवृष्टीत खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांना नुकसानभरपाई द्या — आमदार कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी
सप्टेंबरमधील अतिवृष्टीत खरडून गेलेल्या जमिनी व फळबागांना नुकसानभरपाई द्या — आमदार कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी
धाराशिव : प्रतिनिधी
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये जमिनी खरडून गेल्या असून फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा महसूल व कृषी विभागाने करून शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट नुकसानभरपाई जमा करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली.

जुलै ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुग, मका, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आणि मदत जाहीरही झाली. मात्र, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकाखालची जमीनच वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच गंभीर झाले आहे.
राज्य शासनाच्या निकषांनुसार एका हंगामात एकदाच आपत्ती निवारण निधीमधून मदत देण्यात येते. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील नुकसानीच्या आधारे भरपाई मिळाल्यानंतर सप्टेंबरमध्ये झालेल्या जमिनी खरडून जाण्याच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडचणी येत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना यामुळे अन्याय सहन करावा लागत असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले.
याचबरोबर सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे अनेक फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने यांचे पंचनामे केलेले असून, त्यांनाही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
सप्टेंबरमधील अतिवृष्टी ही ऑगस्टपेक्षा अधिक तीव्र असल्याने शासनाने स्वतंत्रपणे या नुकसानीचा विचार करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



