ब्रेकिंगमहाराष्ट्र
गावात मुक्काम, ग्रामस्थांशी थेट संवाद; जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांची ‘जनतेच्या दारी प्रशासन’ संकल्पना साकार
तीर्थ बुद्रुकमध्ये स्वच्छता, शिवार फेरी, वृक्षारोपण अन् विकासाचा आराखडा; ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचे कौतुक !

0
7
6
4
9
7
गावात मुक्काम, ग्रामस्थांशी थेट संवाद; जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांची ‘जनतेच्या दारी प्रशासन’ संकल्पना साकार
तीर्थ बुद्रुकमध्ये स्वच्छता, शिवार फेरी, वृक्षारोपण अन् विकासाचा आराखडा; ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचे कौतुक !
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
जिल्हा प्रशासनाचा सर्वोच्च अधिकारी थेट गावात मुक्कामी राहत ग्रामस्थांच्या सुख-दुःखात सहभागी होत असेल, तर प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो, याची प्रचिती तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे आली. जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी दि. ५ जून रोजी गावात मुक्काम करत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला आणि विकासाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

या दौऱ्यात तहसीलदार अरविंद बोळंगे, ग्राममहसूल आधिकारी अमोल निरफळ ,गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेव तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ औपचारिक पाहणी न करता गावकऱ्यांच्या समस्या, अडचणी, अपेक्षा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळे प्रत्यक्ष जाणून घेतले. विशेषतः वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.
ग्रामस्थांच्या सहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुस्पष्ट आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील थेट संवादामुळे अनेक प्रश्नांना जागेवरच दिशा मिळाली.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी पुजार यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव स्वच्छतेत सहभाग नोंदविला. त्यानंतर शिवार फेरी काढून शेती व ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

तात्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी सुरू केलेली लोकाभिमुख प्रशासनाची परंपरा नूतन जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनीही प्रभावीपणे पुढे नेल्याचे चित्र या दौऱ्यात पाहायला मिळाले. गोरगरिबांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता, कामातील तत्परता आणि प्रत्यक्ष गावपातळीवर पोहोचून समस्या जाणून घेण्याची कार्यपद्धती यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.“प्रशासन जनतेच्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारा हा मुक्कामी दौरा ठरला असून, तीर्थ बुद्रुकच्या विकासाला नवी दिशा देणारा उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
0
7
6
4
9
7



