Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पत्रकार अनिल आगलावे यांना राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार प्रदान

प्रदीर्घकाळच्या निस्वार्थ समाजसेवेचा गौरव; सामाजिक कार्य व लोकाभिमुख पत्रकारितेची राज्यस्तरावर दखल

0 7 6 5 0 5

पत्रकार अनिल आगलावे यांना राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्कार प्रदान

प्रदीर्घकाळच्या निस्वार्थ समाजसेवेचा गौरव; सामाजिक कार्य व लोकाभिमुख पत्रकारितेची राज्यस्तरावर दखल

तुळजापूर, : धाराशिव जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल आगलावे यांना राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य (रायगड) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न राज्यस्तरीय पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.

पनवेल येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, स्वागताध्यक्ष तथा माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल नाचपल्ले, महिला राज्याध्यक्ष रेखा सुडे, राज्य सरचिटणीस संतोष भोजने, महिला राज्य सरचिटणीस विनया जाधव, राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, धाराशिव जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय, हक्क व संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी पत्रकारिता आणि समाजकारण या दोन्ही माध्यमांतून अनिल आगलावे यांनी प्रदीर्घ काळ निस्वार्थपणे कार्य केले आहे. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविणे तसेच गरजू घटकांना मदतीचा हात देणे या त्यांच्या कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील रहिवासी असलेले अनिल आगलावे हे पुजारी नगर फाउंडेशनचे संस्थापक सदस्य असून संस्कार भारती धाराशिव जिल्हा कार्यकारिणी सदस्य, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच आमदार संवाद मंचचे मुख्य समन्वयक म्हणून विविध क्षेत्रांत सक्रियपणे कार्यरत आहेत. जात, धर्म, पंथ आणि पक्षीय भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने योगदान देत आहेत.पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दैनिक सामना, पुणे येथे उपसंपादक म्हणून कार्य केल्यानंतर ते सध्या तरुण भारत, सोलापूर या दैनिकाचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील मूलभूत समस्या, शेतकरी प्रश्न, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न यांना त्यांनी आपल्या लेखणीद्वारे सातत्याने वाचा फोडली आहे.समाजकारणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांमध्ये तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे राबविण्यात आलेल्या जलसंधारण मोहिमेचा विशेष उल्लेख केला जातो. आमदार संवाद मंचच्या माध्यमातून गावात सुमारे चार हजार सीसीटी बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. लोकसहभागातून साकारलेल्या या उपक्रमामुळे भूजल पातळीत वाढ होऊन गावाच्या जलसमृद्धीत मोलाचे योगदान मिळाले आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीत जनजागृती, समन्वय आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी आगलावे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.शासन, प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांना गती मिळवून दिली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मिळालेला राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न
पुरस्कार केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून त्यांनी ज्या वंचित, गरजू आणि उपेक्षित घटकांसाठी सातत्याने कार्य केले त्या सर्व समाजघटकांच्या योगदानाचाही गौरव असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणारे भारतरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातील युवा पत्रकाराला मिळाल्याने जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारिता आणि लोकहितासाठी समर्पित समाजकार्य यांचा संगम असलेल्या अनिल आगलावे यांच्या कार्याला मिळालेली ही राज्यस्तरीय पावती म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे