कांद्याला भाव नाही;धारूरच्या शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय पाच एकर कांद्यावर फिरवीला रोटर !
कांद्याला भाव नाही;धारूरच्या शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय पाच एकर कांद्यावर फिरवीला रोटर !
कांद्याला भाव नाही;धारूरच्या शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय पाच एकर कांद्यावर फिरवीला रोटर !
तुळजापूर : प्रतिनिधी
कृषी धोरणातील अनिश्चितता, बाजारातील भाव कोसळणे आणि उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत सापडला आहे. धाराशिव तालुक्यातील धारूर येथील शेतकरी महेश गोरोबा गुंड यांना मात्र यंदाच्या कांदा हंगामाने अक्षरशः उध्वस्त केले आहे.
गट क्रमांक 248 मधील पाच एकर क्षेत्रात त्यांनी हाती घेतलेली कांदा लागवड आता डोळ्यात पाणी आणणारी ठरली आहे. रोप, फवारणी, पाणी विकत, मजुरी अशा सर्व खर्चांचा हिशोब करता एकूण दोन लाख 35 हजार रुपये खर्च झाला. कांदा काढणीसाठी तयार असतानाच बाजारात मात्र भाव कोसळले.सध्या कांद्याचे दर किमान पाच रुपये किलो तर सर्वाधिक अकरा रुपये किलो इतकेच मिळत आहेत.
या दरात कांदा विकला तर काढणीचाही खर्च परवडण्याची शक्यता नाही. कांदा काढणी, वाहतूक, हमाली, मजुरी असा अंदाजे 80 हजाराचा खर्च गुंड यांना बसत आहे. त्यापेक्षा कांदा जमिनीत बुजवून टाकण्याचा पर्याय स्वस्त ठरत असून त्यासाठी सुमारे साडेसात हजार रुपये खर्च येतो.
“काढणी केली तर तोटा जास्त, बुजवला तर तोटा कमी! सरकार काही मार्ग काढत नसेल, तर शेतकरी शेतीसाठी का टिकणार?” असा जळजळीत सवाल महेश गुंड यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांचा खर्च वाढतोय, हमाली आणि वाहतुकीचे दर वाढत आहेत, उत्पादन मात्र भावाला पडत नाही—या चक्रात शेतकरी अक्षरशः चिरडला जात आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून भावाला हमी द्यावी, अन्यथा प्रदेशातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडतील, अशी मागणी होत आहे.



