शेतकऱ्यांच्या पधरात आळ्या आणि कुजलेलं धान्य; पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह!
राशन दुकानातील धान्यात आळ्या! अमृतवाडी शेतकऱ्यांची प्रशासनाकडे तातडीने चौकशीची मागणी!
शेतकऱ्यांच्या पधरात आळ्या आणि कुजलेलं धान्य; पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह!

राशन दुकानातील धान्यात आळ्या! अमृतवाडी शेतकऱ्यांची प्रशासनाकडे तातडीने चौकशीची मागणी!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील अमृतवाडी येथील शेतकरी गोपाळ बाबुराव घंदुरे यांनी तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. गावातील सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत (राशन दुकान) मिळणारे ज्वारी, गहू आणि तांदूळ या धान्यात चक्क आळ्या, कीड, कुज व दुर्गंधीयुक्त धान्य आढळत आहे. या निकृष्ट दर्जाच्या धान्यामुळे ग्रामीण जनतेत संताप व्यक्त होत आहे.“आनंदाचा शिधा तर झालाच गायब” मात्र दिवाळीच्या तोंडावर कुचके धान्य शेतकऱ्यांना राशन दुकानातून मोफत म्हणून वाटप कितपत योग्य आहे.

घंदुरे यांचा सवाल आहे — “पुरवठा अधिकारी जबाबदार नाही, धान्य दुकानदार जबाबदार नाही, मग जबाबदार कोण?” तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना निकृष्ट धान्य देऊन ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे शेतकरी आसमानी संकट, अवकाळी पाऊस व कर्जाच्या बोज्याने होरपळतो आहे, त्यातच “प्रधान मंत्री गरिब कल्याण अन्न” योजनेंतर्गत मोफत मिळणारे अन्नसुद्धा निकृष्ट दर्जाचे असेल, तर शेतकऱ्यांचा कैवारी कोण, शेतकऱ्यांच्या समस्या मांडायच्या कुणाकडे असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. आमदार-खासदार स्थानिक पुढारी निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या मतांसाठी धावतात, मात्र अन्नाचा प्रश्न असताना कोणीही पुढे येत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “शेतकऱ्यांना खान्यालायक, दर्जेदार धान्य मिळालेच पाहिजे,” अशी मागणी अमृतवाडीसह परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.



