६७ लाखांअभावी २४ कोटींची कॅथलॅब अडखळली; डीपीडीसी स्थगिती उठवण्याची आमदार पाटील यांची मागणी…
कॅथलॅब सुरू न झाल्याने हृदयरुग्णांची हेळसांड;जनतेच्या जीवाशी खेळ नको !
कॅथलॅब सुरू न झाल्याने हृदयरुग्णांची हेळसांड;जनतेच्या जीवाशी खेळ नको !
तुळजापूर : प्रतिनिधी
शासनाने आरोग्याशी संबंधित कामांवरील डीपीडीसी स्थगिती तात्काळ उठवावी, आरोग्याच्या विषयात राजकारण नको, अशी ठाम मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.

धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय परिसरात तब्बल २४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली अत्याधुनिक कॅथलॅब सुविधा अखेरच्या टप्प्यात आहे. परंतु, हे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी केवळ ६७ लाख रुपयांच्या ट्रान्सफॉर्मर व डीजी सेटची आवश्यकता आहे. डीपीडीसी निधीवरील स्थगितीमुळे या कामाला ब्रेक लागला असून, ९० टक्के काम पूर्ण होऊनही सुविधा उपलब्ध होत नाही, ही खंत आमदारांनी व्यक्त केली.

“६७ लाख रुपयांच्या किरकोळ कामासाठी २४ कोटींचा खर्च वाया जाणे दुर्दैवी आहे. हृदयरुग्णांसाठी अँजिओप्लास्टीसारखी जीवनावश्यक सुविधा सुरू होण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे शासनाने किमान आरोग्याशी संबंधित कामांवर राजकारण न करता तातडीने स्थगिती उठवावी,” असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
औषध खरेदीसाठीसुद्धा या स्थगितीचा मोठा फटका बसत असून रुग्णांना उसनवारी करून औषधे घ्यावी लागत आहेत. “जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ नये. राजकारण वेगळ्या ठिकाणी राहू द्या, पण सर्वसामान्यांच्या जीविताशी संबंधित कामांवर त्याचा परिणाम होऊ नये,” असे आमदार पाटील यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, धाराशिव रुग्णालयासाठी मंजूर झालेले एमआरआय मशीन इचलकरंजीला हलविण्याच्या प्रयत्नांना आमदार पाटील व स्थानिकांच्या विरोधामुळे अडथळा आला असून हे मशीन धाराशिवलाच मिळाले आहे. ते लवकरच सुरू होणार आहे. तसेच सीसीबीचे ५० बेडचे आयसीयू अंतिम टप्प्यात असून गॅस पाईपलाईन व उपकरणांच्या तांत्रिक मान्यतेसाठी आमदार स्वतः पाठपुरावा करत आहेत.
“जनतेच्या आरोग्यास प्राधान्य द्या, मतभेद व बाजूला ठेवा,” असे आवाहन करून आमदार कैलास पाटील यांनी कॅथलॅब व इतर सुविधा तातडीने सुरू करण्याची गरज अधोरेखित केली.



