ब्रेकिंगमहाराष्ट्र
पवनचक्कीच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; मुख्य फरार आरोपी लोणावळ्यात जेरबंद! भूम पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सुकटा शिवारातील मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी होता फरार; वाढदिवसाच्या पार्टीसाठी लोणावळ्यात येताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0
8
5
6
3
1
पवनचक्कीच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; मुख्य फरार आरोपी लोणावळ्यात जेरबंद! भूम पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सुकटा शिवारातील मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी होता फरार; वाढदिवसाच्या पार्टीसाठी लोणावळ्यात येताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या
भूम : प्रतिनिधी
पवनचक्कीच्या वादातून लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केल्याच्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपीला भूम पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली आहे. सचिन उर्फ भैय्या बबन जानकर (वय ३१, रा. सुकटा, ता. भूम, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा घडल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
भूम पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक २०८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे. सुकटा शिवारात पवनचक्कीच्या वादातून फिर्यादीला अडवून लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके यांनी तपास पूर्ण करून निष्पन्न आरोपींविरुद्ध यापूर्वीच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, मुख्य आरोपी सचिन जानकर फरार होता.
वाढदिवसाच्या पार्टीचा सुगावा; लोणावळ्यात सापळा
आरोपी वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात येणार असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल मोहिते यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला सूचना दिल्या. भूम पोलिसांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने परिसरात सापळा रचला आणि रात्रीच्या सुमारास आरोपीला शिताफीने अटक केली.
विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक आरोपीविरुद्ध धाराशिव आणि पुणे जिल्ह्यातील वाकड, दिघी, हिंजवडी तसेच भूम पोलीस ठाण्यांत यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये मारहाण, अपहरण आणि शस्त्र अधिनियमासह अन्य कायद्यांतील गुन्ह्यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भूम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक बर्डे, पोलीस अंमलदार अमोल कवडे आणि जयराम क्षीरसागर यांच्या पथकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने केली. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
0
8
5
6
3
1



