ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजाभवानी मंदिरातील कथित गैरप्रकाराची चौकशी होणार! दोषी आढळणाऱ्यांवर निश्चित कारवाई करा; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भूमिका

0
8
5
6
2
0
तुळजाभवानी मंदिरातील कथित गैरप्रकाराची चौकशी होणार!
दोषी आढळणाऱ्यांवर निश्चित कारवाई करा; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भूमिका
तुळजापूर : तुळजापूर नामा
श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात घडलेल्या कथित प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांना सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मांडली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील पीकविमा प्रकरणाच्या सुनावणीच्या अनुषंगाने आपण काल सकाळपासून नवी दिल्ली येथे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. दरम्यान, तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात घडलेल्या कथित प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांना दिल्याचे स्पष्ट केले.
▪️दोषींना पाठीशी घालणार नाही!
मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रवेशव्यवस्था आणि नियमांच्या पालनाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तींची भूमिका तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
श्री तुळजाभवानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने मंदिरातील नियम, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाचा कारभार पारदर्शक असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीकडे भाविकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आता जिल्हा प्रशासनाच्या चौकशीतून काय निष्पन्न होते आणि संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
8
5
6
2
0



