ब्रेकिंगमहाराष्ट्र
शारदीय नवरात्र कार्यक्रम पत्रिकेत आमदार,नगराध्यक्षांचा उल्लेख करा!
‘लोकप्रतिनिधींचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान’; जनहित संघटनेचे मंदिर संस्थानला निवेदन, अन्यथा ‘बोंब मारो’ आंदोलनाचा इशारा

0
8
5
6
2
0
शारदीय नवरात्र कार्यक्रम पत्रिकेत आमदार,नगराध्यक्षांचा उल्लेख करा!
‘लोकप्रतिनिधींचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान’; जनहित संघटनेचे मंदिर संस्थानला निवेदन, अन्यथा ‘बोंब मारो’ आंदोलनाचा इशारा
तुळजापूर, : प्रतिनिधी
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ च्या कार्यक्रम पत्रिकेत आमदार आणि नगराध्यक्ष या लोकप्रतिनिधींच्या पदाचा सन्मानपूर्वक उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी जनहित संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अजय साळुंके यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, यापूर्वी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेत संबंधित लोकप्रतिनिधींची नावे घेण्यात येतील, असे संस्थानकडून लेखी कळविण्यात आले होते. मात्र, २०२६ च्या नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेत आमदार तसेच नगराध्यक्ष या दोन्ही लोकप्रतिनिधींची नावे वगळण्यात आल्याचा आरोप जनहित संघटनेने केला आहे.
‘लोकप्रतिनिधींचा सन्मान राखा’
लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करीत असल्याने कार्यक्रम पत्रिकेत त्यांच्या पदाचा उल्लेख न करणे हा केवळ लोकप्रतिनिधींचा नव्हे, तर जनतेचा अपमान असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय व्यवस्थेत सदस्य म्हणून लोकप्रतिनिधींचेही स्थान असून, प्रशासकीय सदस्यांप्रमाणे लोकप्रतिनिधींच्या पदाचाही सन्मानपूर्वक उल्लेख करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कार्यक्रम पत्रिकेची पुनर्मुद्रणाची मागणी
नवरात्र महोत्सव २०२६ची कार्यक्रम पत्रिका पुनर्मुद्रित करून त्यामध्ये संबंधित लोकप्रतिनिधींच्या पदांचा योग्य व सन्मानपूर्वक उल्लेख करावा, अशी मागणी जनहित संघटनेने केली आहे.
या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास संस्थानच्या प्रशासकीय कार्यपद्धतीविरोधात ‘बोंब मारो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थान, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाने कामकाज होणे अपेक्षित असताना कार्यक्रम पत्रिकेतील उल्लेखावरून निर्माण झालेल्या या वादाकडे आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

0
8
5
6
2
0



