Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शारदीय नवरात्र महोत्सवासाठी प्रशासन सज्ज!

२८०० पोलिसांचा बंदोबस्त; सहा मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्रे, २०० फिरती स्वच्छतागृहे अन् २४ तास वीजपुरवठा

0 8 5 6 2 6

शारदीय नवरात्र महोत्सवासाठी प्रशासन सज्ज!

२८०० पोलिसांचा बंदोबस्त; सहा मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्रे, २०० फिरती स्वच्छतागृहे अन् २४ तास वीजपुरवठा

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणाऱ्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, भाविकांच्या सुरक्षिततेसह आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येणार आहे.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

यंदाचा शारदीय नवरात्र महोत्सव ११ ऑक्टोबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होणार आहे. परंपरेनुसार त्याआधी दि.३ ऑक्टोबर रोजी देवींची मंचकी निद्रा सुरू होणार असून, ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार आहे. या काळात तिक्षेत्र तुळजापूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने प्रशासनाने विविध उपाययोजनांचे नियोजन केले आहे.

◾२४ तास अखंडित वीजपुरवठा

नवरात्र काळात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत विभागाकडून २४ तास अखंडित वीजपुरवठा केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, भाविकांच्या मार्गदर्शनासाठी दिशादर्शक व मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत.

◾आरोग्य यंत्रणा सज्ज

भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शहरात येणाऱ्या सहा प्रमुख मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात येणार आहेत. साथरोग नियंत्रण पथके नियुक्त केली जाणार असून गर्दीच्या ठिकाणी दुचाकी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

◾२०० फिरती स्वच्छतागृहे; दर्शन मंडपाचीही व्यवस्था

नगर परिषदेच्या वतीने भाविकांसाठी मंडप उभारणी, घाटशीळ येथे दर्शन मंडप, चप्पल ठेवण्याची व्यवस्था, कपाट सुविधा, भवानी कुंड येथे स्नानगृह, शहरात विश्रामकक्ष, २०० फिरती स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी तसेच भवानी कुंड परिसरात शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

◾खाद्यपदार्थांवर प्रशासनाची नजर

अन्न व प्रशासन विभागाच्या वतीने अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत राहणार असून खाद्यपदार्थांवर काटेकोर देखरेख ठेवण्यात येणार आहे. अन्न विक्रेत्यांसाठी कार्यशाळा घेऊन स्वच्छतेच्या नियमांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच खवा, पेढे, दूध व तेलाचे नमुने घेण्यात येणार आहेत.

◾२८०० पोलिसांचा बंदोबस्त

शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी २ हजार ८०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहणार असून, महोत्सव काळात वाहतुकीच्या मार्गात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत.

◾प्रशासनाच्या तयारीकडे भाविकांचे लक्ष

नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक आणि भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्र महोत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भाविकाभिमुख करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.

आढावा बैठकीस पोलिस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर पाटील, तहसीलदार अरविंद बोळंगे, मंदिर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत हमरोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, आपसिंगेकर तसेच विविध विभागांचे अधिकारी आदि उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे