Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘मराठवाड्यात पाणी नाही; म्हणून बाप्पा समुद्राकडे!’पाणी बचतीचा अनोखा संदेश देत मेडसिंग्याहून मुंबईकडे गणरायाची स्वारी; लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन अरबी समुद्रात विसर्जन करण्याचा मनोज जाधव यांचा संकल्प

पाणी बचतीचा अनोखा संदेश देत मेडसिंग्याहून मुंबईकडे गणरायाची स्वारी; लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन अरबी समुद्रात विसर्जन करण्याचा मनोज जाधव यांचा संकल्प

0 8 5 6 2 6

‘मराठवाड्यात पाणी नाही; म्हणून बाप्पा समुद्राकडे!’

पाणी बचतीचा अनोखा संदेश देत मेडसिंग्याहून मुंबईकडे गणरायाची स्वारी; लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन अरबी समुद्रात विसर्जन करण्याचा मनोज जाधव यांचा संकल्प

धाराशिव | प्रतिनिधी

मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पाण्याची टंचाई आणि शेतकरी संकटात असताना गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर टाळण्याचा अनोखा संदेश देण्याचा संकल्प मेडसिंगा येथील मनोज जाधव यांनी केला आहे. घरातील गणपती मूर्ती मुंबई येथे नेऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अरबी समुद्रात विधिवत विसर्जन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आवश्यक सहकार्य व मार्गदर्शनाची मागणी करण्यात आली आहे.

जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या घरी विधिवत पूजा-अर्चा करून श्री गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, सध्या मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची उपलब्धता अत्यंत मर्यादित असल्याने मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करणे योग्य ठरणार नाही, अशी त्यांची भावना आहे.

त्यामुळे ‘पाणी वाचवा, पर्यावरण जपा’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी गणरायाला थेट मुंबईच्या समुद्राकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मेडसिंग्याहून मुंबईपर्यंत गणरायाचा प्रवास

दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी मेडसिंगा येथून या प्रवासाला सुरुवात करण्याचा त्यांचा मानस आहे. मेडसिंगा–धाराशिव–बार्शी–कुर्डूवाडी–टेंभुर्णी–इंदापूर–भिगवण–हडपसर–पुणे मार्गे मुंबई गाठल्यानंतर लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यात येणार आहे. त्यानंतर नियमानुसार श्री गणपती मूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्याची योजना आहे.

‘बाप्पाच्या विसर्जनातून पाणी बचतीचा संदेश!’

या उपक्रमामागे कोणताही व्यावसायिक अथवा प्रसिद्धीचा हेतू नसून मराठवाड्यातील पाणीटंचाईची जाणीव, पाणी बचत आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा मुख्य उद्देश असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

प्रवासादरम्यान कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच संबंधित प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल. मूर्तीची वाहतूक व विसर्जन करताना शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

प्रशासनाकडे सहकार्याची मागणी

या उपक्रमाची नोंद घेऊन आवश्यक परवानग्या व प्रशासकीय बाबींविषयी मार्गदर्शन करावे, तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, अशी मागणी मनोज जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

“मराठवाड्यात पाणी नाही, म्हणून गणपती विसर्जनासाठी समुद्राकडे…” या संकल्पनेतून पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बाप्पाच्या विसर्जनालाच सामाजिक संदेशाचे रूप देण्याचा हा उपक्रम प्रशासनाच्या परवानगी व नियमांच्या चौकटीत प्रत्यक्षात येतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे