Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

उजनी धरणाच्या रक्षणासाठी नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा एल्गार!

भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी रास्ता रोको आंदोलन; शेतकरी, मच्छीमारांसह लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग

0 8 5 6 2 0

उजनी धरणाच्या रक्षणासाठी नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा एल्गार!

भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी रास्ता रोको आंदोलन; शेतकरी, मच्छीमारांसह लोकप्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग

औदुंबर जाधव : भूम

उजनी धरणाचे अस्तित्व टिकविण्यासह स्थानिक शेतकरी, मच्छीमार बांधवांचे हक्क आणि जलसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आज उजनी धरण परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी उजनी धरणाच्या रक्षणासाठी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ‘भूमिपुत्रांच्या हक्कासाठी एकजुटीने लढूया, उजनी धरण वाचवूया’ असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनाला शेतकरी, मच्छीमार बांधव, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आमदार रोहितदादा पवार, खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते.

उजनी धरण हे केवळ पाण्याचा साठा नसून लाखो शेतकरी कुटुंबांच्या शेतीचा, हजारो मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा आणि परिसरातील नागरिकांच्या जीवनाचा प्रमुख आधार आहे. उजनीच्या पाण्यावर अनेक गावांची शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या जलसंपत्तीबाबत कोणताही निर्णय घेताना स्थानिक नागरिकांचे हित सर्वोच्च स्थानी असणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.

प्रकल्पांच्या नावाखाली उजनीच्या अस्तित्वाला धोका नको!

उजनी धरणाच्या परिसरात डेटा सेंटर, सौरऊर्जा प्रकल्प, हायड्रोजन प्रकल्प किंवा अन्य कोणतेही औद्योगिक प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेताना त्याचा पाणीसाठा, पर्यावरण, शेती आणि स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम विचारात घेणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिक शेतकरी आणि मच्छीमार बांधवांच्या हक्कांवर गदा येता कामा नये, अशी ठाम भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

विकासाला आमचा विरोध नाही; मात्र विकास करताना स्थानिक जनतेला विश्वासात घेणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांचे हित जपणे अत्यंत आवश्यक आहे. उजनी धरणाच्या पाण्याचा वापर आणि भविष्यातील प्रकल्पांबाबत पारदर्शक निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

शेतकरी आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी एकजुटीचा निर्धार

उजनी धरण वाचविणे ही केवळ एका भागाची किंवा काही व्यक्तींची जबाबदारी नसून संपूर्ण परिसरातील नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. शेतकरी, मच्छीमार, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भवितव्याशी उजनी धरण जोडलेले आहे. त्यामुळे उजनीच्या संरक्षणासाठी सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या रास्ता रोको आंदोलनातून स्थानिक जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. उजनी धरणाचे अस्तित्व, पाण्याची सुरक्षितता, पर्यावरणाचे संवर्धन आणि भूमिपुत्रांचे हक्क अबाधित राहावेत, यासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

‘एकजुटीने लढूया, उजनी धरण वाचवूया!’ या घोषणेने परिसर दुमदुमून गेला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे