ब्रेकिंगमहाराष्ट्र
रस्त्याच्या कामासाठी होणारा पाणी उपसा थांबवा; अन्यथा ‘जलाभिषेक आंदोलन’
रस्त्याच्या कामासाठी होणारा पाणी उपसा थांबवा; अन्यथा ‘जलाभिषेक आंदोलन’

0
8
5
6
2
0
रस्त्याच्या कामासाठी होणारा पाणी उपसा थांबवा; अन्यथा ‘जलाभिषेक आंदोलन’
केशेगाव–तुळजापूर मार्गावरील पाणी उपशाबाबत मनोज जाधव यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
धाराशिव : तुळजापूर नामा
धाराशिव जिल्हा तीव्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना राज्यमार्ग क्र. २०८ तेर–तुळजापूर–अक्कलकोट मार्गावरील केशेगाव ते तुळजापूर रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. हा पाणी उपसा तात्काळ थांबवावा, अशी मागणी शेतकरी पुत्र तथा रुग्णसेवक मनोज जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धाराशिव जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर असून उपलब्ध जलसाठ्यांवर नागरिक तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा भार आहे. आगामी काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असताना रस्ते बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत असल्यास त्याचा परिणाम स्थानिक जलसाठ्यांवर होऊ शकतो, अशी चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

केशेगाव ते तुळजापूर दरम्यान सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या पाणी उपशाची तातडीने पाहणी करून तो थांबवावा, तसेच दुष्काळी परिस्थितीचा विचार करून बांधकामासाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
याबाबत संबंधित विभागाने सात दिवसांच्या आत ठोस कार्यवाही करावी, अन्यथा उपलब्ध कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामध्ये संबंधित जलस्रोताच्या ठिकाणी ‘जलाभिषेक आंदोलन’ करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सदर पाणी उपशामुळे स्थानिक जलसाठ्यावर नेमका किती परिणाम होत आहे, याची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी धाराशिव आणि पाटबंधारे विभाग क्र. २, तुळजापूर यांना देण्यात आल्या आहेत.
0
8
5
6
2
0



