ब्रेकिंगमहाराष्ट्र
२४ वर्षे ३० दिवस देशसेवा; पंढरपूरचा सुपुत्र विक्रम नाईकनवरे सैन्यदलातून निवृत्त!
भारतीय सैन्यदलातील प्रदीर्घ व निष्ठावंत सेवेला विराम; विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत प्रशिक्षण क्षेत्रातही ठसा

0
8
5
6
2
6
२४ वर्षे ३० दिवस देशसेवा; पंढरपूरचा सुपुत्र विक्रम नाईकनवरे सैन्यदलातून निवृत्त!
भारतीय सैन्यदलातील प्रदीर्घ व निष्ठावंत सेवेला विराम; विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत प्रशिक्षण क्षेत्रातही ठसा
पंढरपूर : संजय निंबाळकर
देशसेवेचे व्रत घेत तब्बल २४ वर्षे ३० दिवस भारतीय सैन्यदलात निष्ठेने सेवा बजावणारे पंढरपूरचे सुपुत्र विक्रम राजाराम नाईकनवरे नुकतेच सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले. दि. २ ऑगस्ट २००२ रोजी भारतीय सैन्यदलाच्या कोअर ऑफ सिग्नलमध्ये दाखल झालेल्या नाईकनवरे यांनी प्रदीर्घ सेवाकाळात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

सैन्यदलातील सेवाकाळात त्यांनी पंजाब येथे अन्नपुरवठा निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच कवायत प्रशिक्षक आणि डब्ल्यू.टी. उस्ताद म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले. हिमाचल प्रदेश येथे आर.एच.एम., गोवा येथे सी.एच.एम. तर पंजाबमध्ये सी.क्यू.एम. अशा विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली.

नव्या जवानांना घडविण्यात मोलाचा वाटा

नव्याने सैन्यदलात दाखल झालेल्या जवानांना तसेच अधिकारी आणि कनिष्ठ नेतृत्व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात नाईकनवरे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या अनुभवातून अनेक जवानांना शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सैनिकी जीवनाचे धडे देत त्यांना देशसेवेसाठी सक्षम करण्याचे काम त्यांनी केले.

विशेष म्हणजे सैन्यसेवेची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कर्तव्य बजावत असताना शिक्षणाचीही कास धरत त्यांनी आपल्या जिद्दीचे दर्शन घडविले.
‘आई-वडिलांची प्रेरणा, आजीचा आशीर्वाद’
सेवानिवृत्तीनंतर भावना व्यक्त करताना विक्रम नाईकनवरे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांची प्रेरणा आणि आजीच्या आशीर्वादाला दिले. “आई-वडिलांची प्रेरणा आणि आजीच्या आशीर्वादाने आपण हे कर्तव्य पार पाडू शकलो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
२४ वर्षांची प्रदीर्घ देशसेवा पूर्ण करून स्वगृही परतलेल्या विक्रम नाईकनवरे यांच्या निष्ठावंत सेवेला पंढरपूर परिसरातून सलाम करण्यात येत असून, त्यांच्या योगदानाबद्दल नागरिकांकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
देशसेवेची प्रदीर्घ कारकीर्द पूर्ण करणाऱ्या या वीर सुपुत्राला मनःपूर्वक सलाम!
0
8
5
6
2
6



