ब्रेकिंगमहाराष्ट्र
एसटीच्या प्रसाधनगृहांत घाण आढळली तर विभाग नियंत्रकांची खैर नाही! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा स्वच्छतेबाबत कडक पवित्रा; कंत्राटदारांच्या नावाखाली जबाबदारी झटकता येणार नाही!
एसटीच्या प्रसाधनगृहांत घाण आढळली तर विभाग नियंत्रकांची खैर नाही!

0
8
5
6
2
6
एसटीच्या प्रसाधनगृहांत घाण आढळली तर विभाग नियंत्रकांची खैर नाही!
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा स्वच्छतेबाबत कडक पवित्रा; कंत्राटदारांच्या नावाखाली जबाबदारी झटकता येणार नाही!
मुंबई | तुळजापूर नामा
एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांत अस्वच्छता आढळल्यास आता केवळ कंत्राटदारांवर कारवाई करून प्रशासनाला हात झटकता येणार नाही. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांनाही थेट जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशांनुसार झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आला. प्रवाशांकडून स्वच्छतेसाठी अधिभार आकारला जात असताना त्यांना अस्वच्छ प्रसाधनगृहांचा सामना करावा लागणे ही बाब गंभीर असून, स्वच्छतेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची भूमिका या बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात २२ ऑक्टोबर रोजी प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला महामंडळाचे सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते. बसस्थानकांवरील स्वच्छतेचा आढावा घेत अधिकाऱ्यांना नियमित तपासणी आणि प्रभावी देखरेखीबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले.
◾कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून मोकळे होता येणार नाही!
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करणे, स्वच्छतेचा दर्जा कायम राखणे आणि संबंधित कंत्राटदार संस्थांकडून करारातील अटींनुसार काम करून घेणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. केवळ कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, तर आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेवर अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवले पाहिजे, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. प्रवाशांना स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन कमी पडल्यास जबाबदारी निश्चित केली जाईल. विशेषतः प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित विभाग नियंत्रकांवर कारवाईची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
◾दोन रुपये स्वच्छता अधिभार; मग सुविधा अस्वच्छ का?
एसटीच्या प्रवासात सर्वसामान्य नागरिकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लाखो प्रवासी बसस्थानकांवरील सुविधांचा वापर करतात. प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारला जातो. ही रक्कम भरल्यानंतर किमान स्वच्छ आणि आरोग्यदायी प्रसाधनगृहे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, बसस्थानकांवरील अस्वच्छतेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असेल, तर ती बाब महामंडळाच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या कामात कुचराई करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यावर भर देण्यात आला.
◾स्वच्छ बसस्थानके हीच महामंडळाची जबाबदारी!
एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ बसस्थानके, स्वच्छ प्रसाधनगृहे आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे हे महामंडळाचे कर्तव्य आहे. यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करावे, नियमित तपासणी करावी आणि स्वच्छतेचा दर्जा कायम राखावा, असे निर्देश देण्यात आले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वच्छतेच्या प्रश्नावर घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या व्यवस्थापनात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता नियमांचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांसोबतच देखरेखीत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित होणार असल्याने बसस्थानकांवरील स्वच्छतेच्या प्रश्नाकडे प्रशासनाला गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.
0
8
5
6
2
6



