ब्रेकिंगमहाराष्ट्र
धाराशिवमध्ये पाण्याची आणीबाणी; पाणी जपून वापरा! धरणांत केवळ ६.४४ टक्के पाणीसाठा; ४१ दिवसांत १२.८५ दलघमी पाणी घटले, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन
धाराशिवमध्ये पाण्याची आणीबाणी; पाणी जपून वापरा! धरणांत केवळ ६.४४ टक्के पाणीसाठा; ४१ दिवसांत १२.८५ दलघमी पाणी घटले, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन

0
8
5
6
2
0
धाराशिवमध्ये पाण्याची आणीबाणी; पाणी जपून वापरा!
धरणांत केवळ ६.४४ टक्के पाणीसाठा; ४१ दिवसांत १२.८५ दलघमी पाणी घटले, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन
धाराशिव : तुळजापूर नामा
जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये ११ ऑक्टोबर रोजी केवळ ६.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील दहा महिने पाणी जपून वापरण्याची गरज आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

◾४१ दिवसांत जलसाठ्यात मोठी घट
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता सुमारे ७२५ दशलक्ष घनमीटर आहे. १ सप्टेंबर रोजी प्रकल्पांमध्ये ५९.६ दलघमी पाणी होते. ११ ऑक्टोबरपर्यंत हा साठा घटून ४६.७५ दलघमीवर आला. म्हणजेच ४१ दिवसांत १२.८५ दलघमी पाण्याची घट नोंदविण्यात आली आहे.

वाढते तापमान, बाष्पीभवन आणि भूजलपातळीतील घसरण यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. ऑक्टोबरमध्ये साधारणतः ३० ते ३१ अंश सेल्सिअस असणारे कमाल तापमान यंदा ३४ ते ३५ अंशांपर्यंत पोहोचल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले. भूजलपातळीतील घसरणही सप्टेंबरमधील सहा मीटरवरून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ८.६६ मीटरपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विहिरी आणि बोअरवेलमधील पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
◾२०१५ च्या पाणीटंचाईची पुनरावृत्ती टाळा!
सन २०१५ मध्ये जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी जलसाठा १२ दलघमीपर्यंत घसरला आणि नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४६८ टँकर सुरू करावे लागले होते. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
संभाव्य दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रत्येक गावात नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जनावरांसाठी चारा-पाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळवून देण्यावर भर दिला जात असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
◾पाणी बचतीसाठी सर्वांनी पुढे यावे
पाणीटंचाईचा सामना करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध साठ्याचा जपून वापर करावा. प्रशासन, शासन आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास संभाव्य संकटाचा सामना करता येईल. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीयांनी सामूहिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
0
8
5
6
2
0



