ब्रेकिंगमहाराष्ट्र
‘संघर्षयोद्धा’ जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तुळजापूर भगवेमय!
पोस्टरबाजी, बॅनरबाजीने शहर सजले; 'एक मराठा, कोटी मराठा'च्या घोषणांनी वातावरण दणाणले
0
8
5
6
2
6
‘संघर्षयोद्धा’ जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तुळजापूर भगवेमय!
पोस्टरबाजी, बॅनरबाजीने शहर सजले; ‘एक मराठा, कोटी मराठा’च्या घोषणांनी वातावरण दणाणले
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या तुळजापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. आई तुळजाभवानीच्या पावन नगरीत होणाऱ्या त्यांच्या स्वागतासाठी मराठा समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी आणि बॅनरबाजी करत जोरदार तयारी सुरू केली आहे.

शहरातील प्रमुख चौक, प्रवेशद्वार, मुख्य रस्ते आणि चौकाचौकांत “संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांचे तुळजापूर नगरीत सहर्ष स्वागत” अशा आशयाचे भव्य फलक झळकत असून, भगव्या पताका आणि स्वागत कमानींनी शहराचे रूपच पालटले आहे. “एक मराठा… कोटी मराठा!” या घोषणांनी शहरातील वातावरण मराठा आरक्षणाच्या समर्थनाने भारावून गेले आहे.

अनेक बॅनर्सवर मनोज जरांगे-पाटील यांचा “संघर्षयोद्धा” असा उल्लेख करण्यात आला असून, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना,जनहित संघटना तसेच विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

काही ठिकाणी स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत मनोज जरांगे-पाटील यांची छायाचित्रे असलेले फलक झळकल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. स्वागताच्या निमित्ताने विविध स्तरांतील कार्यकर्ते एकाच पोस्टरवर दिसत असल्याने एकजुटीचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

दरम्यान, जरांगे-पाटील यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन सुरू केले असून, तुळजापूरमध्ये स्वागत सोहळा, शांतता रॅली आणि सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

0
8
5
6
2
6



