ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजाभवानी मंदिरासमोर भाविकाची ९० हजारांची सोन्याची चैन लंपास! तेलंगणातील भाविकाला चोरट्यांचा फटका; बीडच्या तरुणाला तुळजापूर पोलिसांनी घेतले ताब्यात

0
8
5
6
2
6
तुळजाभवानी मंदिरासमोर भाविकाची ९० हजारांची सोन्याची चैन लंपास! तेलंगणातील भाविकाला चोरट्यांचा फटका; बीडच्या तरुणाला तुळजापूर पोलिसांनी घेतले ताब्यात
तुळजापूर : तुळजापूरनामा
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या तेलंगणातील भाविकाच्या गळ्यातील अंदाजे ९० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १.१९ वाजण्याच्या सुमारास मंदिरासमोर घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बीड येथील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरातील भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरेंदर बिक्षापती चिंतला (वय ४६, रा. निंबोली अड्डा, काचेगोडा, हैदराबाद, तेलंगणा) हे तुळजापूर येथे आले होते. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी मंदिरासमोर त्यांच्या अंदाजे १५ ग्रॅम वजनाच्या, ९० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चेनची चोरी झाली. याप्रकरणी त्यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून तेजस सुशील तुसांबड (रा. वतार, भलभीमनगर, ता. जि. बीड) आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या आधारे तुळजापूर पोलिसांनी तेजस तुसांबड याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणातील दुसऱ्या व्यक्तीबाबत तसेच चोरीच्या मुद्देमालाबाबत पुढील तपास सुरू आहे.तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक तुळजापुरात येतात. अशा गर्दीच्या ठिकाणी भाविकांनी दागिने व मौल्यवान वस्तूंबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.
0
8
5
6
2
6



