ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजाभवानीच्या गर्भगृहात बनावट पासचा खेळ ?
बेकायदेशीर प्रवेश आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी

0
8
5
6
2
0
तुळजाभवानीच्या गर्भगृहात बनावट पासचा खेळ?
बेकायदेशीर प्रवेश आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी
तुळजापूर,: तुळजापूरनामा
श्री तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात कथित बनावट पासच्या आधारे भाविकांना प्रवेश दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि सुरक्षेतील त्रुटी असल्याचा दावा करत संबंधित व्यक्तींसह दोषी आढळणाऱ्या मंदिर अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांची चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या आरतीनंतर सुमारे १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान १५ ते २० भाविकांना गर्भगृहात नेऊन दर्शन घडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नवरात्रोत्सवातील सकाळच्या चरणतीर्थ आणि रात्रीच्या प्रक्षाळ पूजेच्या वेळेचा गैरफायदा घेत बनावट पास तयार करून काही भाविकांना प्रवेश दिला जात असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

या कथित प्रकारात महंत, आणि रोचकरी यांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत. मंदिरातील काही अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कथित संगनमतातून परराज्यातील भाविकांकडून मोठी रक्कम घेऊन प्रवेश दिला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून चौकशीतूनच त्यातील तथ्य स्पष्ट होणार आहे.
◾सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, गर्भगृह व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तांत्रिक तपासणी करावी, तसेच वितरित आणि वापरलेल्या पासची पडताळणी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. कथित आर्थिक व्यवहारांचीही तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीत दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विभागीय व कायदेशीर कारवाई करावी आणि सर्व भाविकांसाठी समान नियमांची अंमलबजावणी करावी, असेही नमूद करण्यात आले आहे. या अर्जाची २४ तासांच्या आत दखल घेऊन कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.
◾मंदिराच्या पारदर्शक कारभाराकडे लक्ष
श्री तुळजाभवानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे गर्भगृहातील प्रवेशव्यवस्था, पास वितरण आणि मौल्यवान अलंकारांची सुरक्षा याबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे महत्त्वाचे ठरणार आहे.

0
8
5
6
2
0



