ब्रेकिंगमहाराष्ट्र
गणेशोत्सवापूर्वी काक्रंब्यात खाकीचा ‘दणका’!
पोलिसांचे संचलन; कायदा हातात घेणाऱ्यांना थेट इशारा — उत्सव भक्तीने करा, उपद्रव केला तर कारवाईला सामोरे जा!

0
8
5
6
2
6
गणेशोत्सवापूर्वी काक्रंब्यात खाकीचा ‘दणका’!
पोलिसांचे संचलन; कायदा हातात घेणाऱ्यांना थेट इशारा — उत्सव भक्तीने करा, उपद्रव केला तर कारवाईला सामोरे जा!
तुळजापूर | प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे पोलिसांनी संचलन करत कायदा व सुव्यवस्थेचा स्पष्ट संदेश दिला. गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण असला तरी उत्सवाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा कडक इशारा या संचलनातून देण्यात आला.

गणेशोत्सव काळात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणारे, समाजात तेढ निर्माण करणारे अथवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. भक्तीच्या उत्सवाला गालबोट लावणाऱ्या उपद्रवींना खाकीचा दणका बसणार, असा संदेश पोलिसांच्या संचलनामुळे स्पष्ट झाला आहे.

धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील तसेच तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त, नागरिक आणि गणेशभक्त रस्त्यावर येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलिसांसमोरचे महत्त्वाचे आव्हान आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे या संचलनातून दाखवून देण्यात आले.
‘उत्सव करा, पण कायद्याच्या चौकटीत!’
गणेशोत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा करताना नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वादविवाद टाळावेत आणि शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कायद्याचे पालन करणाऱ्या गणेशभक्तांसाठी पोलीस सदैव सोबत; मात्र कायदा मोडणाऱ्यांसाठी कारवाईचा हात कठोर राहणार, असा स्पष्ट संदेश काक्रंब्यातील पोलिसांच्या संचलनातून देण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दाखविलेली ही सज्जता पाहता ‘भक्तीला मान, पण कायद्याला सर्वोच्च स्थान!’ अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याचे चित्र आहे.
0
8
5
6
2
6



