Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सरसकट कर्जमाफीसाठी स्वाभिमानीचा मराठवाडा संवाद दौरा

शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटनात्मक बांधणीला चालना; तुळजाभवानी चरणी लढ्याचे साकडे

0 8 5 6 2 6

सरसकट कर्जमाफीसाठी स्वाभिमानीचा मराठवाडा संवाद दौरा

शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटनात्मक बांधणीला चालना; तुळजाभवानी चरणी लढ्याचे साकडे

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी वर्गाच्या ज्वलंत प्रश्नांवर व्यापक जनजागृती करून सरसकट कर्जमाफीसाठी लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मराठवाडा संघर्ष व संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा २१ ते २४ जूनदरम्यान मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत पार पडणार आहे.
दौऱ्याची सुरुवात रविवारी तुळजापूर येथून करण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री तुळजाभवानी मंदिर येथे आरती करून शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारण्याचे बळ देण्याचे साकडे घातले.
सध्या शेतकरी वर्ग अनेक संकटांचा सामना करीत असून कर्जमाफी योजनांमध्ये विविध अटी-शर्ती लादण्यात आल्याने मोठा वर्ग वंचित राहत असल्याची भावना ग्रामीण भागात आहे. त्यातच पावसाला झालेला विलंब आणि संभाव्य दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे, संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि आगामी आंदोलनांची दिशा निश्चित करणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे, घनश्यामभाऊ चौधरी, धाराशिव जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, युवक प्रदेशाध्यक्ष अमर कदम, राज्य प्रवक्ते अनिल पवार, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांच्यासह राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दौऱ्यानंतर संघटनेच्या राज्य कार्यकारिणीत नवीन नियुक्त्या करण्यात येणार असून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक संघटनात्मक बदलही करण्यात येणार आहेत. “राजकारणासाठी शेतकरी नाही, तर शेतकऱ्यांसाठी राजकारण” ही भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना नव्या जोमाने संघर्ष उभारणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

मराठवाडा संवाद दौऱ्याचे वेळापत्रक

◾ २१ जून – तुळजापूर (दुपारी १२ वा.), लातूर (दुपारी ३ वा.)
◾ २२ जून – नांदेड (दुपारी १२ वा.), हिंगोली (दुपारी ३ वा.)
◾ २३ जून – परभणी (दुपारी १२ वा.), जालना (दुपारी ३ वा.)
◾२४ जून – छत्रपती संभाजीनगर (दुपारी २ वा.)

प्रत्येक जिल्ह्यातील शाखा प्रमुख, जिल्हाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असून शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करून पुढील लढ्याची दिशा निश्चित केली जाणार आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे