ब्रेकिंगमहाराष्ट्र
मुरलीच्या सुरांत आई तुळजाभवानीचे दिव्य रूप!
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला मुरली अलंकार महापूजा संपन्न; देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

0
8
5
6
2
0
मुरलीच्या सुरांत आई तुळजाभवानीचे दिव्य रूप!
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला मुरली अलंकार महापूजा संपन्न; देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
तुळजापूर | तुळजापूरनामा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात सहाव्या माळेनिमित्त शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी देवीची मुरली अलंकार महापूजा भक्तिभावात संपन्न झाली. देवीच्या या लोभस आणि दिव्य स्वरूपाच्या दर्शनाने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

धार्मिक आख्यायिकेनुसार, महिषासुराशी युद्ध सुरू असताना देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडते. मुरलीधर रूपातील देवीने मुरलीवादनाच्या माध्यमातून स्वर्गातील भयभीत देव-देवता आणि ऋषीमुनी यांना धीर दिला, तसेच त्यांच्या मनात आनंद व उत्साह निर्माण केला, अशी मान्यता आहे. याच दिव्य स्वरूपाचे दर्शन मुरली अलंकार महापूजेच्या माध्यमातून भाविकांना घडते.

राजहंस वाहनावरून छबिना मिरवणूक

दरम्यान, गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक राजहंस वाहनावरून काढण्यात आली. या धार्मिक सोहळ्याला तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक माळेला देवीच्या विविध अलंकार पूजा आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून आई तुळजाभवानीच्या वेगवेगळ्या स्वरूपांचे दर्शन भाविकांना घडत आहे. त्यामुळे तुळजापूर नगरीत भक्ती, श्रद्धा आणि चैतन्याचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.
0
8
5
6
2
0



