Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

काळेगावचा रस्ता खड्ड्यांत गायब; ग्रामस्थांचा जीव टांगणीला!

डांबरीकरण नको, आता कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीट रस्ताच करा; जिल्हा परिषद सदस्या सिमाताई माडजे यांच्याकडे आकाश भोवाळ यांची आग्रही मागणी

0 8 5 6 2 6

काळेगावचा रस्ता खड्ड्यांत गायब; ग्रामस्थांचा जीव टांगणीला!

डांबरीकरण नको, आता कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीट रस्ताच करा; जिल्हा परिषद सदस्या सिमाताई माडजे यांच्याकडे आकाश भोवाळ यांची आग्रही मागणी

तुळजापूर : प्रतिनिधी

अक्कलकोट–तुळजापूर महामार्गापासून काळेगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. दरवर्षी डागडुजी करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ राहत असल्याने आता तात्पुरती मलमपट्टी नको, तर या रस्त्याचे दर्जेदार सिमेंट काँक्रीटीकरण करून कायमस्वरूपी तोडगा काढा, अशी आग्रही मागणी काळेगाव येथील आकाश कालिदास भोवाळ यांनी मंगरूळ गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सिमाताई भैरवनाथ माडजे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मंगरूळ जिल्हा परिषद गटातील काळेगाव हे अक्कलकोट–तुळजापूर महामार्गापासून अवघ्या ३०० ते ५०० मीटर अंतरावर आहे. मात्र, महामार्गापासून गावात जाणाऱ्या मुख्य प्रवेश रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने हा काहीशे मीटरचा प्रवासही ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पाच वर्षांपूर्वी डांबरीकरण; पुन्हा रस्त्याची चाळण!

या रस्त्याचे सुमारे पाच वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र परिसरातील जमीन काळी व चुनखडीयुक्त असल्याने पावसाळ्यात जमीन खचते. परिणामी रस्ता खराब होऊन डांबर निघणे आणि मोठमोठे खड्डे पडणे हा प्रकार वारंवार घडत असल्याचे भोवाळ यांनी म्हटले आहे.

दरवर्षी खड्डे बुजवायचे, पुन्हा पावसाळा आला की रस्ता खचायचा आणि ग्रामस्थांनी पुन्हा त्याच खड्ड्यांतून प्रवास करायचा, या दुष्टचक्राला आता कायमचा पूर्णविराम द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

विद्यार्थी, महिला, ज्येष्ठांचा जीवघेणा प्रवास

रस्त्यावर पडलेल्या मोठ्या आणि धोकादायक खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे ग्रामस्थांना अपघात होऊन दुखापती झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असून गावाचा मुख्य महामार्गाशी सुरक्षित संपर्कच धोक्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रुग्णवाहिका अडकली तर जबाबदार कोण?

एखाद्या गंभीर रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलविण्याची वेळ आल्यास या खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका आणि अन्य वाहनांना अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

हा प्रश्न केवळ खराब रस्त्यापुरता मर्यादित राहिलेला नसून ग्रामस्थांची सुरक्षितता, विद्यार्थ्यांचा प्रवास आणि आपत्कालीन आरोग्यसेवेशी थेट जोडला गेला आहे.

‘तात्पुरती मलमपट्टी नको; काँक्रीटीकरणासाठी निधी द्या!’

स्थानिक जमिनीची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पुन्हा डांबरीकरण किंवा केवळ खड्डे बुजविण्यावर निधी खर्च करून प्रश्न सुटणार नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अक्कलकोट–तुळजापूर महामार्गापासून काळेगावपर्यंतच्या मुख्य प्रवेश रस्त्याचे दर्जेदार सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद सदस्या सिमाताई माडजे यांनी स्वतः या प्रश्नात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांकडून रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी, तांत्रिक सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करून आवश्यक निधी मंजूर करण्यासाठी ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी आकाश भोवाळ यांनी केली आहे.

वर्षानुवर्षे रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास सहन करणाऱ्या काळेगावकरांची ही मागणी आता प्रशासन किती गांभीर्याने घेते आणि सिमेंट काँक्रीट रस्त्याचा प्रश्न प्रत्यक्षात कधी मार्गी लागतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे