Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची पायी वारी ; भक्तिभावाने धरली तुळजापूरची वाट

कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारीही पायी प्रवासात सहभागी

0 8 5 6 2 0

आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची पायी वारी ; भक्तिभावाने धरली तुळजापूरची वाट

कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारीही पायी प्रवासात सहभागी

धाराशिव,दि.२४ ऑक्टोबर (जिमाका)

आई तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ,मनात अपार श्रद्धा आणि पावलोपावली भक्तिभाव… अशा वातावरणात जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी आज,शनिवार,२४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून तुळजापूरच्या दिशेने पायी प्रस्थान केले.विशेष म्हणजे,त्यांच्या या भक्तिमय पायी प्रवासात श्रीमती.सौम्याश्री पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक श्री.विश्वास करे,कृषी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे,महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव, तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे,धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात कोजागिरी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी धाराशिव ते तुळजापूर असा पायी प्रवास करून आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्याचा संकल्प केला आहे.प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत त्यांनी देवीच्या दर्शनासाठी पायी वारीची वाट धरली आहे.

जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे जिल्हाधिकारी श्री.पुजार यांचे आज एक वेगळेच रूप पाहायला मिळाले.एरवी जिल्ह्याच्या विकासकामांचा,विविध शासकीय योजनांचा आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात व्यस्त असणारे जिल्हाधिकारी आज मात्र आई तुळजाभवानीच्या दर्शनाची आस मनात बाळगून पायी प्रवासाला निघाले.त्यांच्या या प्रवासात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही सहभागी झाल्याने या पायी वारीला सामूहिक भक्तीची जोड मिळाली आहे.

उद्या,रविवार,२५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असून,श्री तुळजाभवानी मंदिराची पौर्णिमा सोमवार,२६ ऑक्टोबर रोजी असणार आहे.या पार्श्वभूमीवर तुळजापूरच्या धार्मिक वातावरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी पायी जाण्याची परंपरा भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेली आहे.याच भक्तिमय वातावरणात जिल्हाधिकारी पुजार यांनीही पायी प्रवासाचा मार्ग स्वीकारला आहे.

प्रशासकीय पदाचा मान,दैनंदिन कामकाजाचा व्याप आणि जबाबदाऱ्यांची व्यस्तता बाजूला ठेवून आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पायी निघालेल्या जिल्हाधिकारी पुजार यांच्या या वारीतून श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडत आहे. धाराशिव ते तुळजापूरचा हा पायी प्रवास केवळ एका धार्मिक दर्शनापुरता मर्यादित नसून,महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीप्रती असलेल्या निस्सीम श्रद्धेची अनुभूती देणारा ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे