Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या संमतीला केराची टोपली? शेतालगत पवनचक्की उभारल्याचा गंभीर आरोप!

शासन नियमांना फाटा दिल्याचा दावा; ‘नुकसानभरपाई देतो’ म्हणत टाळाटाळ, टोरेंट सोलरजेन कंपनीच्या चौकशीसाठी शेतकऱ्याची जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांकडे धाव

0 8 5 6 2 6

शेतकऱ्यांच्या संमतीला केराची टोपली? शेतालगत पवनचक्की उभारल्याचा गंभीर आरोप!

शासन नियमांना फाटा दिल्याचा दावा; ‘नुकसानभरपाई देतो’ म्हणत टाळाटाळ, टोरेंट सोलरजेन कंपनीच्या चौकशीसाठी शेतकऱ्याची जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांकडे धाव

तुळजापूर : प्रतिनिधी

शेतकऱ्यांची संमती नाही, नियमांचे पालन झाले की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आणि नुकसानभरपाईसाठी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनांची बोळवणूक! लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील शेतजमिनीलगत पवनचक्की उभारल्याच्या प्रकरणावरून आता वादाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. जमीनधारकांची कोणतीही संमती न घेता आणि शासन नियमांना कथितरीत्या फाटा देऊन पवनचक्की उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप करत प्रदीप बाळासाहेब माढेकर यांनी टोरेंट सोलरजेन लिमिटेड कंपनीविरोधात चौकशी व कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

याप्रकरणी माढेकर यांनी दि. २० जुलै रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून, पवनचक्की उभारणीची संपूर्ण चौकशी करून नियमभंग आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पवनचक्कीचे पंखे शेताच्या हद्दीत; शेतकरी म्हणतो, ‘आमची संमती कुठे?’

तक्रारीनुसार, हिप्परगा (रवा) येथील गट क्रमांक ५१० मध्ये अनुसया मुकुंद माढेकर यांच्या नावे १ हेक्टर ५७ आर, तर सुरेखा बाळासाहेब माढेकर यांच्या नावे १ हेक्टर क्षेत्र आहे. या जमिनीत शेततळे आणि आंबा बागायत विकसित करण्यात आली असून या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

मात्र, याच शेतजमिनीलगत संबंधित जमीनधारकांची कोणतीही संमती न घेता पवनचक्की उभारण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पवनचक्कीच्या पंख्यांची व्याप्ती आपल्या मालकीच्या क्षेत्रात येत असून त्यांची सावली आणि मोठ्या आवाजाचा शेतीवर परिणाम होत असल्याचा दावाही माढेकर यांनी केला आहे.

पवनचक्की उभारण्यासाठी आवश्यक अंतर राखले गेले का? शासनाच्या नियमांचे पालन झाले का? आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या का? आणि जमीनधारकांची संमती नसेल तर पवनचक्की उभी राहिलीच कशी? असे प्रश्न आता या तक्रारीमुळे उपस्थित झाले आहेत.

‘नुकसानभरपाई देऊ’चे आश्वासन; पण दिड वर्षापासून पदरी प्रतीक्षाच! तक्रार देऊन व्याकूळ

या प्रश्नावर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा पाठपुरावा केल्याचे माढेकर यांनी म्हटले आहे. ‘तुम्हाला नुकसानभरपाई देऊ, काळजी करू नका,’ असे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्ष नुकसानभरपाई देण्याची वेळ आली की टाळाटाळ करण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे.

उंडरगाव शिवारातील तोरंबा रस्त्यावरील उपकेंद्रातही वेळोवेळी चौकशी करण्यात आली. मात्र, तांत्रिक कारणे पुढे करून नुकसानभरपाईचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

पवनचक्कीची अधिकृत मोजणी करा; नियमभंग असेल तर कारवाईचा बडगा उगारा!

पवनचक्की आणि शेतजमीन यांच्यातील अंतराची शासकीय यंत्रणेमार्फत तातडीने अधिकृत मोजणी करावी. पवनचक्की उभारणीसाठीच्या सर्व परवानग्या, जमीनधारकांची संमती आणि शासनाच्या नियमांची काटेकोर तपासणी करावी, अशी मागणी माढेकर यांनी केली आहे.

चौकशीत नियमांचे उल्लंघन किंवा फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर कोण देणार?

संमतीविना पवनचक्की उभारल्याचा आरोप गंभीर असताना प्रशासन आता काय भूमिका घेणार? आवश्यक अंतर आणि शासन नियमांची तपासणी होणार का? नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लागणार का? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. तक्रारीनंतर प्रशासन कंपनीच्या परवानग्यांची आणि प्रत्यक्ष जागेची तपासणी करून काय कारवाई करते, याकडे आता शेतकरी कुटुंबाचे लक्ष लागले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे