ब्रेकिंगमहाराष्ट्र
मारहाण व ॲट्रॉसिटीच्या आरोपांना न्यायालयात सुरुंग!
घाटंग्री ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह आई-वडिलांची निर्दोष मुक्तता; ॲड.विशाल साखरे यांच्या बचाव युक्तिवादाला यश

0
8
5
6
2
6
मारहाण व ॲट्रॉसिटीच्या आरोपांना न्यायालयात सुरुंग!
घाटंग्री ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह आई-वडिलांची निर्दोष मुक्तता; ॲड.विशाल साखरे यांच्या बचाव युक्तिवादाला यश
धाराशिव | ज्ञानेश्वर गवळी
घाटंग्री येथील ग्रामपंचायत उपसरपंच व त्यांच्या आई-वडिलांविरुद्ध मारहाण तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, धाराशिव यांनी तिन्ही आरोपींची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपी क्रमांक १ ते ३ यांच्या वतीने ॲड.विशाल प्रभाकर साखरे यांनी प्रभावीपणे बचावाची बाजू मांडली.
सदर प्रकरणाची घटना सन २०२० मधील असून, पाणी भरण्याच्या कारणावरून पीडितेचा पदर आरोपीच्या घागरीस लागल्याचे सांगत घागरीतील पाणी सांडून “शिवता शिवत जमत नाही” असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच राजाराम पवार यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला होता. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा क्रमांक ४०/२०२० दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात ॲड.विशाल साखरे यांनी बचाव पक्षाची बाजू मांडताना फिर्यादीच्या कथनातील विसंगती तसेच घटनेच्या अनुषंगाने उपलब्ध पुराव्यांवर न्यायालयाचे लक्ष वेधले. पीडिता व तिचे पती राजकारणात सक्रिय असून आरोपी क्रमांक १ हे ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते. त्यामुळे राजकीय द्वेषातून ही फिर्याद दाखल करण्यात आल्याचा समर्पक बचाव ॲड. साखरे यांनी घेतला.
◾‘घटना घडलीच कशी?’ बचाव पक्षाने उपस्थित केले सवाल
बचाव पक्षाने न्यायालयासमोर मांडलेल्या मुद्द्यांमध्ये, २०१८-२०१९ मध्ये गावात मोठी पाण्याची टाकी बांधण्यात आली असून त्यावरून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होत असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे लहान टाकी बंद असताना तेथे पाणी भरण्यास जाण्याचा संबंधच काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यामुळे फिर्यादीने सांगितलेली घटना प्रत्यक्षात घडली नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
तसेच, ज्या घागरीतील पाणी सांडल्याचा आरोप करण्यात आला, ती घागर पोलिसांनी जप्त केलेली नाही, ही बाबही बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
◾‘पंचनामेही संशयाच्या भोवऱ्यात!’
या प्रकरणात पोलिसांकडून चुकीचा तपास करण्यात आल्याचा युक्तिवाद ॲड.विशाल साखरे यांनी केला. तसेच पंचनामे खोटे असल्याची बाबही न्यायालयासमोर मांडण्यात आली. फिर्यादी राजकीयदृष्ट्या सक्रिय असून आरोपी हे राजकीय विरोधक असल्याने कोणताही जातिभेद न करता केवळ राजकीय द्वेषातून ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद होता.
बचाव पक्षाने मांडलेले युक्तिवाद व प्रकरणातील पुरावे ग्राह्य धरून माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. खोमणे साहेब यांनी तिन्ही आरोपींची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात ॲड.विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे,ॲड.महेश लोहार,ॲड. शुभम तांबे,ॲड. अमित गोळे,ॲड .आकाश,ॲड. संकेत गोरे,ॲड.ओंकार कोरेगावकर,ॲड.अर्चना कांबळे, ॲड.लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड . रोहित लोमटे आणि ॲड. पृथ्वीराज खोचरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
0
8
5
6
2
6



