ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजाभवानी दर्शनासाठी आलेल्या भाविकेचे चार तोळ्यांचे गंठण लंपास; तुळजापूर पोलिसांनी आरोपीला सोलापुरातून जेरबंद केले
सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा; १.२० लाखांचे दागिन्यांसह आरोपी ताब्यात घेतले.
0
8
5
6
2
6
तुळजाभवानी दर्शनासाठी आलेल्या भाविकेचे चार तोळ्यांचे गंठण लंपास; तुळजापूर पोलिसांनी आरोपीला सोलापुरातून जेरबंद केले
सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा; १.२० लाखांचे दागिन्यांसह आरोपी ताब्यात घेतले.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकेच्या गळ्यातील सुमारे चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरी करणाऱ्या आरोपीला तुळजापूर पोलिसांनी सोलापुरातून अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले संपूर्ण सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून या कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सौ.आशा उर्फ चिमणाबाई दयाराम शिंदे (वय ६५,मूळ रा. बारामती, सध्या रोहिदासनगर,भवानी रोड, तुळजापूर) या दि. १८ जानेवारी २०२६ रोजी निर्मला गायकवाड यांच्यासह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. दर्शन करून शहाजीराजे महाद्वारासमोरील परिसरातून घरी जात असताना ओटीच्या दुकानासमोर काही महिलांनी त्यांना घेराव घालून ढकलाढकली केली. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण लंपास केले होते. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
घटनेची गंभीर दखल घेत तुळजापूर पोलिसांनी मंदिर परिसर व शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सोलापूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सोलापुरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेले संपूर्ण सोन्याचे गंठण व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत असून मंदिर परिसरातील गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे,पोलिस बालाजी कामतकर,करण कोळेकर,शिवाजी शिरसाट आणि संतोष करवार यांच्या पथकाने पार पाडली.
▪️दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दिलासा
तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत घडलेल्या चोरीच्या घटनेचा तातडीने उलगडा करून आरोपीला अटक करण्यात आल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे.मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
0
8
5
6
2
6



