Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अकॅडमी नाही, महागडे प्रशिक्षण नाही; जिद्द आणि सरावाच्या जोरावर मयुरेशची राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणीसाठी धडक! पिंपळा बुद्रुकच्या सुपुत्राची अंडर-१७ गटात लातूर विभागातून निवड; तुळजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा!

तुळजापूरच्या मयुरेश तानाजी म्हेत्रे याने सिद्ध करून दाखवले आहे.

0 8 5 6 2 6

अकॅडमी नाही, महागडे प्रशिक्षण नाही; जिद्द आणि सरावाच्या जोरावर मयुरेशची राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणीसाठी धडक!

पिंपळा बुद्रुकच्या सुपुत्राची अंडर-१७ गटात लातूर विभागातून निवड; तुळजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा!

तुळजापूर : तुळजापूरनामा

मनात जिद्द, मेहनतीची तयारी आणि स्वतःच्या कौशल्यावर विश्वास असेल, तर कोणत्याही मोठ्या क्रिकेट अकॅडमीशिवायही यशाचे शिखर गाठता येते, हे तुळजापूरच्या मयुरेश तानाजी म्हेत्रे याने सिद्ध करून दाखवले आहे. शालेय क्रीडा स्पर्धा २०२६ अंतर्गत अंडर-१७ गटातून लातूर विभागाच्या वतीने राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणीसाठी त्याची निवड झाली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या मयुरेशने स्वबळावर मिळवलेल्या या यशामुळे तुळजापूरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मूळचा पिंपळा बुद्रुक गावचा असलेला मयुरेश सध्या तुळजापूर येथील म.वि.रा. शिंदे हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. कोणत्याही क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण न घेता त्याने तुळजापूरच्या तालुका क्रीडा संकुलावर आणि शाळेच्या मैदानावर सराव करत आपले क्रिकेट कौशल्य विकसित केले. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि खेळाप्रती असलेली निष्ठा याच्या बळावर त्याने राज्यस्तरीय निवड चाचणीपर्यंत मजल मारली आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही मयुरेशची अंडर-१४ गटातून राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणीसाठी निवड झाली होती. आता अंडर-१७ गटातही त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केल्याने त्याच्या कामगिरीतील सातत्य अधोरेखित झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही उत्कृष्ट क्रीडागुण आहेत आणि योग्य संधी मिळाल्यास ते मोठी झेप घेऊ शकतात, याचे मयुरेश हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

मयुरेशच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जयप्रकाश पाटील यांनी आनंद व्यक्त करून त्याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक लालासाहेब आदटराव यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. मयुरेशच्या निवडीबद्दल शाळा, शिक्षक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींकडून त्याचे कौतुक होत आहे.

अकॅडमीच्या आधाराशिवाय स्वतःच्या मेहनतीवर मिळवलेले हे यश मयुरेशच्या जिद्दीची साक्ष देणारे आहे. आता राज्यस्तरीय निवड चाचणीतही चमकदार कामगिरी करून मोठ्या क्रिकेट व्यासपीठावर झेप घेण्याची संधी त्याच्यासमोर आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे