ब्रेकिंगमहाराष्ट्र
खासदार ओमराजे निंबाळकरांच्या पाठपुराव्याला यश; तुळजापूरसाठी ५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी
वाढदिवशीच नगरविकास विभागाचा मोठा निर्णय; रस्ते, नाले आणि क्रीडांगण विकासाला मिळणार चालना
0
8
5
6
2
6
खासदार ओमराजे निंबाळकरांच्या पाठपुराव्याला यश; तुळजापूरसाठी ५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी
वाढदिवशीच नगरविकास विभागाचा मोठा निर्णय; रस्ते, नाले आणि क्रीडांगण विकासाला मिळणार चालना
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहराच्या विकासासाठी एकूण ५ कोटी रुपयांच्या विकासकामांना नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या वाढदिवशीच हा निधी मंजूर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास विभागाने दि. १७ जुलै रोजी दोन स्वतंत्र शासन निर्णय जारी केले. त्यानुसार तुळजापूर शहरातील रस्ते, नाल्या, गटारे, पावसाच्या पाण्याचा निचरा तसेच क्रीडांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार ४ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी रस्ते, नाल्या, गटारे आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी मंजूर करण्यात आला असून, ५५ लाख रुपयांचा विशेष निधी तुळजाभवानी गृहनिर्माण संस्थेतील नगरपरिषदेच्या खेळाच्या मैदानाच्या विकासासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील प्रलंबित नागरी सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

या निधीबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समाजमाध्यमांद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तुळजापूरला हा निधी मिळाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भावी जिल्हाध्यक्ष ऋषिकेश मगर यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, “तुळजापूर शहरासाठी हा वाढदिवसाचा गिफ्टच आहे,” असे मत व्यक्त केले. या निधीमुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तुळजापूर हे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे प्रभावक्षेत्र मानले जात असताना, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्यातून शहरासाठी मोठा विकासनिधी मंजूर झाल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. शहराच्या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
0
8
5
6
2
6



