Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

संकटाच्या क्षणी सुरक्षा जवान देवदूत बनून धावला! घाटशीळ मंदिर परिसरात बेशुद्ध पडलेल्या भाविकाला सीपीआर देऊन दीपक पोद्दार यांनी वाचविले प्राण; तुळजाभवानी संस्थानच्या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष प्रसंगी प्रत्यय!

0 8 5 6 2 0

संकटाच्या क्षणी सुरक्षा जवान देवदूत बनून धावला! घाटशीळ मंदिर परिसरात बेशुद्ध पडलेल्या भाविकाला सीपीआर देऊन दीपक पोद्दार यांनी वाचविले प्राण; तुळजाभवानी संस्थानच्या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष प्रसंगी प्रत्यय!

तुळजापूर : तुळजापूरनामा

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या मदतीला धावून जात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने प्रसंगावधान, तत्परता आणि प्रशिक्षणाच्या बळावर माणुसकीचे दर्शन घडविले. तुळजापुरातील घाटशीळ मंदिर परिसरात २५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक अनमता तवर अचानक बेशुद्ध पडले. यावेळी कर्तव्यावर असलेले महाराष्ट्र सुरक्षा दलाचे सुरक्षा जवान दीपक पोद्दार यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना सीपीआर (CPR) देऊन प्राथमिक मदत केली. या तत्परतेमुळे भाविक शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घाटशीळ मंदिर परिसरात भाविक अचानक बेशुद्ध पडल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, अशा आणीबाणीच्या प्रसंगी काय करावे, याचे प्रशिक्षण घेतलेल्या दीपक पोद्दार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्यांनी त्वरित भाविकाला सीपीआर देण्यास सुरुवात केली. वेळेत मिळालेल्या या प्राथमिक मदतीमुळे भाविक शुद्धीवर आले. त्यानंतर एसआयएसपीएलच्या सुरक्षा रक्षकांनी स्ट्रेचरच्या साहाय्याने त्यांना पुढील उपचारांसाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या वेळी सुरक्षा पर्यवेक्षक योगेश फडके, शिवाजी ढवळे आणि इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. संकटाच्या क्षणी सुरक्षा यंत्रणेने दाखविलेली तत्परता भाविकांसाठी दिलासादायक ठरली.

विशेष म्हणजे, शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होण्यापूर्वी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सर्व सुरक्षा रक्षकांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही सीपीआरचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष आणीबाणीच्या प्रसंगी उपयोग झाल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले. गर्दीच्या धार्मिक स्थळांवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ बंदोबस्त पुरेसा नसून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत करता येणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दीपक पोद्दार यांनी दाखविलेली तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद असून, त्यांच्या कृतीतून सुरक्षा जवानांच्या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. भाविकांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी सज्ज असलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या कार्याचे या घटनेमुळे कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे