Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

मालकाची निर्घृण हत्या करून चार राज्यांत पळापळ; धाराशिव पोलिसांनी ४८ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या!

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाला यश

0 8 5 6 2 6

मालकाची निर्घृण हत्या करून चार राज्यांत पळापळ; धाराशिव पोलिसांनी ४८ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या!

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाला यश

धाराशिव | तुळजापूरनामा

मालकाची निर्घृण हत्या करून पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांचा अखेर धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने माग काढला. हत्येनंतर आरोपींनी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांतून प्रवास केल्याचे तपासात समोर आले. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि कसून तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गंभीर गुन्हा करून राज्यांच्या सीमा ओलांडल्या तरी पोलिसांच्या तपासातून सुटका नाही, हे पुन्हा अधोरेखित झाले.

हॉटेल व्यावसायिकाची डोक्यात, चेहऱ्यावर वार करून हत्या

आरणी येथील हॉटेल व्यावसायिक शुभम धर्मराज सोमवंशी (वय २६) यांची डोक्यात तसेच चेहऱ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हत्येनंतर आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेण्यात आला.

चार राज्यांत प्रवास; पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न

तपासादरम्यान आरोपींनी धाराशिव येथून सोलापूर रेल्वे स्थानक, त्यानंतर कर्नाटकातील यादगीर आणि तेलंगणातील हैदराबाद, निजामाबाद व तुप्रान परिसरातून प्रवास केल्याचे समोर आले. वेगवेगळ्या ठिकाणी हालचाली करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या हालचालींचा मागोवा घेत अखेर दोघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणात रमेश पांडव मेहर (वय ३२, रा. खरमुंडा, ता. भटली, जि. बरगड, ओडिशा) आणि मोहम्मद वारीस सफोल अन्सारी (वय १९, रा. मधुपूर, ता. व जि. देवघर, झारखंड) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, दयानंद गादेकर तसेच चापोह नागनाथ गुरव आणि प्रकाश बोईनवाड यांनी पार पाडली.

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

5/5 - (1 vote)

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे