ब्रेकिंगमहाराष्ट्र
मायेचा आधार, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताईंनी दिला धीर!
अश्विनीच्या आठवणींनी गलबलले मन; कुटुंबीयांची भेट घेऊन न्यायासाठी सर्वतोपरी प्रयत्नांचे आश्वासन

0
8
5
6
2
6
मायेचा आधार, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताईंनी दिला धीर!
अश्विनीच्या आठवणींनी गलबलले मन; कुटुंबीयांची भेट घेऊन न्यायासाठी सर्वतोपरी प्रयत्नांचे आश्वासन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या कै. अश्विनी मोहिते पौळ यांच्या कुटुंबीयांची जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी व्हांताळा येथे भेट घेऊन सांत्वन केले. दुःखाच्या या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत अर्चनाताईंनी त्यांना धीर दिला. अश्विनी यांच्या कुस्तीतील कर्तृत्वाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या जुन्या छायाचित्रांनी उपस्थितांचे मन अक्षरशः गलबलून गेले.

शालेय जीवनापासूनच अश्विनी मोहिते यांनी कुस्तीच्या मैदानावर आपल्या जिद्दीची आणि धडाडीची छाप उमटवली होती. विविध कुस्ती स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवत त्यांनी गावाचे तसेच कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले होते. भेटीदरम्यान कुटुंबीयांनी अश्विनी यांच्या कुस्ती स्पर्धांतील कामगिरीचे आणि सत्काराचे जुने छायाचित्रे अर्चनाताईंना दाखविली.

ती छायाचित्रे पाहताना “कितीतरी वर्षांपूर्वीची ती गुणी, जिद्दी आणि धडाडीची मुलगी जशीच्या तशी डोळ्यांसमोर उभी राहिली,” अशा भावना अर्चनाताईंनी व्यक्त केल्या. लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांच्या हस्ते झालेला अश्विनी यांचा सत्कार तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या सन्मानाच्या आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात आला.

‘एका आईच्या कुशीत वाढलेली तीन निष्पाप लेकरं…’
या घटनेने मन हेलावून गेले असून, “एका आईच्या कुशीत वाढलेली तीन निष्पाप, निरागस लेकरं अन् त्यांच्यासोबत आईचंही असं निघून जाणं… यापेक्षा मोठं दुःख आणखी काय असू शकतं?” अशी हळहळ अर्चनाताईंनी व्यक्त केली.
दरम्यान, या घटनेनंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्गच्या पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य परिस्थिती समोर आणावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अश्विनी यांच्या मृत्यूमागचे सत्य समोर यावे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ठाम भूमिका अर्चनाताईंनी व्यक्त केली. दुःखाच्या या कठीण प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.
यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सविताताई बिराजदार, राहुल पाटील सास्तुरकर आणि शीतलताई राहुल पाटील सास्तुरकर उपस्थित होते.
अश्विनी मोहिते आणि त्यांच्या तीन चिमुकल्या मुलांच्या निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून, या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
0
8
5
6
2
6



