ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजाभवानीच्या ‘सिंहासन पूजे’साठी ऑनलाइन नोंदणी सुरू; १९ सप्टेंबरपासून भाविकांना संधी!
ऑक्टोबरमधील पूजेसाठी तीन टप्प्यांत सोडत; ४ ते १० आणि २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान मंचकी निद्रेमुळे सिंहासन पूजा बंद

0
8
5
6
2
0
तुळजाभवानीच्या ‘सिंहासन पूजे’साठी ऑनलाइन नोंदणी सुरू; १९ सप्टेंबरपासून भाविकांना संधी!
ऑक्टोबरमधील पूजेसाठी तीन टप्प्यांत सोडत; ४ ते १० आणि २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान मंचकी निद्रेमुळे सिंहासन पूजा बंद
तुळजापूर | तुळजापूर नामा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि देशाच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने तुळजापुरात दाखल होत असतात. कुलाचार व कुलधर्मासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये श्री देवीजींच्या सिंहासन पूजेला विशेष महत्त्व असल्याने ऑक्टोबर २०२६ महिन्यातील सिंहासन पूजेची नोंदणी आता अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सिंहासन पूजा नोंदणी सुरू होणार असून दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नोंदणीची मुदत संपणार आहे. भाविकांनी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश करून आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तीन फेऱ्यांत सोडत; संदेशाद्वारे कळविणार
सिंहासन पूजेच्या संख्येनुसार ऑनलाइन सोडत पद्धतीने प्रथम सोडत दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार असून, निवड झालेल्या भाविकांना शुल्क भरण्यासाठी संदेश पाठविण्यात येणार आहे. प्रथम सोडतीतील भाविकांना दि. २७ सप्टेंबर सकाळी ११ ते २८ सप्टेंबर सकाळी १० वाजेपर्यंत शुल्क भरण्याची संधी राहणार आहे.
सिंहासन पूजेची संख्या पूर्ण न झाल्यास दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दुसरी सोडत काढण्यात येईल. त्यानंतर निवड झालेल्या भाविकांना दि. २८ सप्टेंबर सकाळी ११ ते २९ सप्टेंबर सकाळी १० वाजेपर्यंत शुल्क भरता येईल.
तरीही सिंहासन पूजेची संख्या पूर्ण न झाल्यास दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तिसरी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीतील भाविकांना दि. २९ सप्टेंबर सकाळी ११ ते ३० सप्टेंबर सकाळी १० वाजेपर्यंत शुल्क भरता येईल.
३० सप्टेंबरला अंतिम यादी
प्रथम, द्वितीय आणि तृतीय फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ऑक्टोबर महिन्यातील अंतिम सिंहासन पूजा नोंदणीची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, दि. ४ ते १० ऑक्टोबर तसेच दि. २१ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्री देवीजींची मंचकी निद्रा असल्याने या काळात सिंहासन पूजा बंद राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भाविकांनी सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून वेळापत्रकानुसार नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी केले आहे.

0
8
5
6
2
0



