Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

न्याय न मिळाल्यास माजी सैनिकांचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

तुळजापुरातील गृहनिर्माण सोसायटीच्या जागेच्या वादावरून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; १५ दिवसांत कारवाईची मागणी

0 8 5 6 2 0

न्याय न मिळाल्यास माजी सैनिकांचा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

तुळजापुरातील गृहनिर्माण सोसायटीच्या जागेच्या वादावरून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; १५ दिवसांत कारवाईची मागणी

तुळजापूर, : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर येथील माजी सैनिक गृहनिर्माण सोसायटीच्या जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न होत असून संबंधित प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत माजी सैनिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. तसेच १५ दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हरिश्चंद्र माणिकराव सूर्यवंशी यांनी सन २०२१ मध्ये सदर जागेच्या मोजणीसाठी न्यायालयात दावा (क्र. ११/२०२१) दाखल केला असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही काही व्यक्ती गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन जागेवर जबरदस्तीने ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

माजी सैनिक गृहनिर्माण सोसायटीच्या म्हणण्यानुसार, मूळ मालक दादाराव जाधव यांच्याकडून ७ ऑक्टोबर १९८९ रोजी सोसायटीच्या नावाने तीन एकर जागा खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर १० ऑक्टोबर १९८९ रोजी हरिश्चंद्र सूर्यवंशी यांनी एक एकर जागा खरेदी केली. मात्र, त्यावेळी जागेची प्रत्यक्ष शहानिशा करण्यात आली नसून खरेदीपत्रातील चतु:सीमा चुकीच्या पद्धतीने नमूद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

सन १९९० पासून सोसायटीच्या सदस्यांचा संबंधित जागेवर ताबा असूनही काही व्यक्ती नामफलक व सिमेंटचे खांब काढून स्वतःच्या नावाचे फलक लावून जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याबाबत पोलीस, महसूल व भूमी अभिलेख कार्यालयांकडे वारंवार पाठपुरावा करूनही योग्य न्याय मिळाला नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून १५ दिवसांच्या आत न्याय्य निर्णय घ्यावा, अन्यथा सर्व जबाबदार अधिकारी व संबंधितांना निवेदन देत लोकशाही मार्गाने अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी सैनिक गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक धाराशिव, उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर, तहसीलदार तुळजापूर तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, धाराशिव यांनाही देण्यात आल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे