Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना!’; इंदापूरमध्ये तरुणाईला उद्योजकतेचा कानमंत्र

‘स्टार्टअप आणि उद्योजकता विकास’ कार्यशाळेत डॉ. मिनाक्षी जगदाळे यांचे प्रतिपादन; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही मार्गदर्शन

0 8 5 6 2 0

‘नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना!’; इंदापूरमध्ये तरुणाईला उद्योजकतेचा कानमंत्र

‘स्टार्टअप आणि उद्योजकता विकास’ कार्यशाळेत डॉ. मिनाक्षी जगदाळे यांचे प्रतिपादन; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही मार्गदर्शन

इंदापूर | प्रतिनिधी

केवळ पदवी हातात घेऊन नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभा करून रोजगारनिर्मिती करणारी पिढी घडविण्याची गरज आहे, असा स्पष्ट संदेश इंदापूर येथे आयोजित उद्योजकता विकास कार्यशाळेत देण्यात आला. “नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बना,” असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ तथा इतिहास अभ्यासिका प्रा. डॉ. मिनाक्षी अमोल जगदाळे यांनी केले.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने ‘साबण व अगरबत्ती निर्मितीसाठी स्टार्टअप आणि उद्योजकता विकास’ या विषयावर विशेष एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. जगदाळे मार्गदर्शन करत होत्या.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी युवा पिढी व महिलांना मार्गदर्शन केले. उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय करणे नव्हे; तर जिद्द, आत्मविश्वास आणि अथक परिश्रमाच्या जोरावर समाजासमोरील समस्या सोडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले. देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देताना तरुणाई आणि महिलांनी अधिक सक्षम व स्वावलंबी होण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

◾आर्थिक स्वावलंबन हाच स्त्रीसन्मानाचा पाया

महिलांनी केवळ पारंपरिक चौकटीत न राहता आपल्या अंगभूत कौशल्याला व्यवसायाची जोड देण्याचे आवाहन डॉ. जगदाळे यांनी केले. “आर्थिक स्वावलंबन हाच स्त्रीसन्मानाचा खरा पाया आहे. उद्योगाच्या माध्यमातून महिलांसमोर प्रगतीची नवी दारे खुली होऊ शकतात,” असे त्या म्हणाल्या.

व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे भांडवल किंवा मोठे दुकान आवश्यक नसते. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेला कच्चा माल, नैसर्गिक घटक आणि स्वतःचे कौशल्य यांचा योग्य वापर करून कमी खर्चात दर्जेदार उत्पादने तयार करता येतात. मात्र उत्पादनाची गुणवत्ता, आकर्षक सादरीकरण, बांधणी व नावाची ओळख यांना तितकेच महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

◾घरगुती उद्योगाला बाजारपेठेची कवाडे खुली

आजच्या काळात दूरध्वनीच्या माध्यमातून व्यवसायाला मोठी बाजारपेठ मिळवून देता येते. ग्राहकांशी थेट संपर्क, उत्पादनांची माहिती, प्रसार आणि विक्री यासाठी विविध समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करता येतो. त्यामुळे घरातून सुरू केलेला छोटासा उद्योगही योग्य नियोजन आणि गुणवत्तेच्या जोरावर मोठ्या व्यवसायाचे रूप घेऊ शकतो, असा विश्वास कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.

व्यवसाय करताना मुद्दल आणि नफा यांची गल्लत न करणे, दैनंदिन व्यवहारांची नोंद ठेवणे, नफ्यातील काही हिस्सा व्यवसायाच्या पुनर्गुंतवणुकीसाठी राखून ठेवणे आणि ग्राहकांच्या प्रतिक्रियेनुसार उत्पादनात सुधारणा करणे, या बाबींवरही मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून संघटित होऊन सामूहिक पातळीवर उद्योग उभारावेत, असे आवाहन करण्यात आले. सामूहिक खरेदीमुळे कच्चा माल कमी दरात मिळू शकतो आणि उत्पादन खर्चात बचत होऊ शकते, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

दरम्यान, मुद्रा योजना, स्टँड-अप इंडिया, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना यांसह शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन अचूक प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यशाळेत प्रशिक्षक डॉ. मन्सूर मौलवी यांनी साबण व अगरबत्ती निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी सौ. सारिकाताई शिरोळे, प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य डॉ. एस. एस. वीर, समन्वयक डॉ. एम. पी. शिंदे, संयोजिका डॉ. जयश्री गटकूळ यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

◾‘स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळू शकते’

हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, स्थानिक कच्च्या मालाचा वापर करून दर्जेदार उत्पादने तयार करण्याची मोठी क्षमता तरुणांच्या हातात आहे. उत्पादनाला नावीन्याची जोड, आकर्षक बांधणी आणि पर्यावरणपूरक सादरीकरण दिल्यास स्थानिक उत्पादनांना स्वतंत्र व्यावसायिक ओळख निर्माण करता येते. आजच्या काळात घरबसल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध असल्याने तरुणांनी रोजगार शोधण्याबरोबरच रोजगार निर्माण करण्याचा दृष्टिकोन स्वीकारावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

✍️◾संजय निंबाळकर, दसूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे