ब्रेकिंगमहाराष्ट्र
दिवाळीच्या उंबरठ्यावर बळीराजाचा टोकाचा निर्णय! धारूरचे शेतकरी मिलिंद रोकडे यांची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
सततची नापिकी, सोयाबीनचे नुकसान आणि आर्थिक विवंचनेची पार्श्वभूमी; युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश जगताप यांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी

0
8
5
6
2
0
दिवाळीच्या उंबरठ्यावर बळीराजाचा टोकाचा निर्णय! धारूरच्या शेतकरी मिलिंद रोकडे यांची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
सततची नापिकी, सोयाबीनचे नुकसान आणि आर्थिक विवंचनेची पार्श्वभूमी; युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश जगताप यांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी
धाराशिव : प्रतिनिधी
एकीकडे दिवाळीचा उत्साह, तर दुसरीकडे शेतकरी कुटुंबाच्या आयुष्यात काळोख! धाराशिव तालुक्यातील धारूर येथील शेतकरी मिलिंद श्रीमंत रोकडे यांनी सततच्या नापिकीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रोकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोकडे यांची धारूर शिवारात गट क्रमांक ४११/२ मध्ये शेती आहे. निसर्गाची प्रतिकूलता, वारंवार होणारी नापिकी आणि सोयाबीन पिकाचे नुकसान यामुळे ते आर्थिक संकटात सापडल्याचे सांगण्यात येत आहे. शेतीचा खर्च, कर्जाचे हप्ते आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी यांची चिंता त्यांना सतावत होती. याच विवंचनेतून त्यांनी रात्री सुमारे दोन ते अडीचच्या दरम्यान गळफास घेऊन जीवन संपविल्याची माहिती आहे.
कर्जाचा तपास सुरू; कुटुंबाला मदतीची अपेक्षा
रोकडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते की खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. संबंधित बाबींची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
पालकमंत्र्यांकडे आर्थिक मदतीची मागणी
या घटनेची गंभीर दखल घेत युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश जगताप यांनी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे रोकडे कुटुंबाची परिस्थिती मांडली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत मिळावी, तसेच संबंधित प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दिवाळीच्या तोंडावर कुटुंबाचा आधार हरपल्याने रोकडे यांच्या पत्नी आणि मुलांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रशासन या कुटुंबाला किती लवकर मदतीचा हात देते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
0
8
5
6
2
0



