Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

न्यायालयाचा निकाल लपवून महसूल विभागाची दिशाभूल?; संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

खोट्या पंचनाम्याच्या भोवऱ्यात तोतया पोलीस पाटील,मंडळ अधिकारीही; जिल्हाभर चर्चेला उधाण!

0 8 5 6 2 0

न्यायालयाचा निकाल लपवून महसूल विभागाची दिशाभूल?; संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

खोट्या पंचनाम्याच्या भोवऱ्यात तोतया पोलीस पाटील,मंडळ अधिकारीही; जिल्हाभर चर्चेला उधाण!

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव येथील गट क्रमांक १३० मधील रस्त्याच्या वादाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून, न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणात खोटा व बनावट पंचनामा तयार करून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दि.१५ जून रोजी सिद्धाप्पा शरणाप्पा मरबे यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

तुळजापूर तालुक्यातील गोळेगाव येथील सिद्धाप्पा शरणाप्पा मरबे यांनी पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. अर्जानुसार,गट क्रमांक १३० मधून रस्ता देण्याबाबतचा वाद सन-१९९८ पासून न्यायालयात सुरू होता. आरसीएस क्र.६८/१९९८ या दाव्यात संबंधित जमिनीतून रस्त्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,तुळजापूर यांनी दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सदर दावा फेटाळून लावला. त्यानंतर दाखल करण्यात आलेले आरसीए क्र.१५/२००७ हे अपीलही न्यायालयाने फेटाळत गट नं.१३० मधून रस्ता देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
असे असतानाही,दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी कथितरित्या खोटा पंचनामा तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार,पत्नी पोलीस पाटील असताना स्वतःला पोलीस पाटील म्हणून दर्शविणाऱ्या कडाजी राजेंद्र सूर्यवंशी यांनी इतर पंचांना प्रवृत्त करून गट नं.१३० मध्ये रस्ता असल्याचा पंचनामा तयार केला. मात्र,अर्जदार सिद्धाप्पा मरबे यांनी त्या पंचनाम्यावर सही करण्यास स्पष्ट नकार दिला आणि न्यायालयाच्या आदेशांच्या प्रमाणित प्रती महसूल अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचा दावा केला आहे.तक्रारीत मल्लीकार्जुन बापुराव मरबे, नागण्णा शिवलिंग मरबे तसेच मंडळ अधिकारी पवन भोकरे यांच्यावरही न्यायालयाचा आदेश डावलून खोटा पंचनामा तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजकीय दबावामुळे महसूल अधिकाऱ्यांनी न्यायालयीन आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचाही गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे.गट नं.१३० मध्ये प्रत्यक्षात कोणताही रस्ता अस्तित्वात नसताना न्यायालयीन निर्णय लपवून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, “पत्नी अधिकृत पोलीस पाटील असताना स्वतःला पोलीस पाटील म्हणून पंचनाम्यावर सही करणाऱ्या कथित तोतया पोलीस पाटलावर कारवाई होणार का?, न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का? आणि महसूल विभागाची दिशाभूल करणाऱ्यांना अभय कुणाचे? असे प्रश्न आता जिल्ह्यातून उपस्थित केले जात आहेत.बोळेगावच्या कथित खोट्या पंचनाम्याचे पडसाद थेट पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचले असून, या प्रकरणातील चौकशी आणि पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे