ब्रेकिंगमहाराष्ट्र
शेतकरी बांधवांनो, टोकाचे पाऊल उचलू नका; संकटात एक फोन करा, मदतीसाठी मी खंबीरपणे उभा! माजी पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे धाराशिवच्या बळीराजाला भावनिक आवाहन
माजी मंत्री तानाजी सावंत

0
8
5
6
2
6
शेतकरी बांधवांनो, टोकाचे पाऊल उचलू नका; संकटात एक फोन करा, मदतीसाठी मी खंबीरपणे उभा! माजी पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे धाराशिवच्या बळीराजाला भावनिक आवाहन
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
कर्जाचा डोंगर, खासगी सावकारांचा तगादा, मुलींच्या लग्नाची चिंता, पशुधनाचा सांभाळ आणि नापिकीच्या संकटाने खचून जाऊ नका! धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे कळकळीचे आवाहन माजी पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी केले आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी एकटे पडू नये; आपल्या अडचणी थेट माझ्यापर्यंत पोहोचवाव्यात, मदतीसाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
धाराशिव मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहेत. कर्जबाजारीपणा, खासगी सावकारांचे आर्थिक दडपण, मुलींच्या विवाहाची जबाबदारी, चार जनावरांचा सांभाळ आणि पिकांच्या नापिकीमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवते. अशा कठीण परिस्थितीत निराश होऊन जीवन संपविण्याचा निर्णय घेणे हा पर्याय नाही. जीवन अनमोल आहे; संकट कितीही मोठे असले, तरी त्यातून मार्ग काढता येतो, हा विश्वास शेतकऱ्यांनी कायम ठेवावा, असा संदेश प्रा. सावंत यांनी दिला.
शेतकरी बांधवांनी आपली अडचण सांगण्यासाठी थेट मला फोन करावा किंवा सभापती तसेच आमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तुमचा प्रश्न समजून घेऊन तो सोडविण्यासाठी शक्य तेवढे सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळण्यास वेळ लागू शकतो; मात्र मदत मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी निराश होऊन टोकाचा निर्णय घेऊ नये. शासकीय मदतीची प्रतीक्षा असली, तरी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला वैयक्तिक स्तरावर शक्य ते सहकार्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी भूमिका माजी पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाला धीर दिला आहे. अडचण मनात ठेवू नका, मदतीसाठी संपर्क साधा आणि कोणत्याही परिस्थितीत जीवन संपविण्याचा विचार करू नका, हेच त्यांचे शेतकरी बांधवांना कळकळीचे आवाहन आहे.
0
8
5
6
2
6



