ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजाभवानीच्या दारी चिमुकल्यांच्या हातात भिक्षेचे पात्र! बालभिक्षावृत्तीच्या तक्रारींनी खळबळ; गुंगीकारक पदार्थांच्या आरोपांची चौकशी करण्याची ॲड. स्वाती शिंदे यांची मागणी

0
8
5
6
2
0
तुळजाभवानीच्या दारी चिमुकल्यांच्या हातात भिक्षेचे पात्र!
बालभिक्षावृत्तीच्या तक्रारींनी खळबळ; गुंगीकारक पदार्थांच्या आरोपांची चौकशी करण्याची ॲड. स्वाती शिंदे यांची मागणी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या पवित्र नगरीत बालभिक्षावृत्तीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंदिर परिसरात लहान मुलांकडून भिक्षा मागून घेतली जात असल्याच्या तक्रारींसह काही बालकांना गुंगीकारक पदार्थ दिले जात असल्याचे गंभीर आरोपही समोर आल्याने या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बाल सहाय्यक पोलीस पथकाच्या सदस्यपदी निवड झालेल्या ॲड. स्वाती शिंदे यांनी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना निवेदन देऊन या प्रश्नात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. मंदिर परिसरातील व्यापारी, पुजारी, स्थानिक नागरिक आणि भाविकांशी संवाद साधताना बालभिक्षेकरी मुलांबाबत विविध तक्रारी व माहिती समोर आल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
चिमुकल्यांच्या बालपणाचा प्रश्न ऐरणीवर!
तुळजापूर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अशा गर्दीच्या ठिकाणी लहान मुले भाविकांकडे भिक्षा मागताना दिसत असल्याच्या तक्रारी आहेत. काही प्रौढ व्यक्ती मुलांना भिक्षा मागण्यासाठी पुढे करतात, तर काही मोठ्या मुली लहान बालकांना कडेवर किंवा झोळीत घेऊन मदतीची याचना करतात, असे निवेदनात म्हटले आहे.
या परिस्थितीमागे गरिबी, स्थलांतर, शिक्षणाचा अभाव, कौटुंबिक असुरक्षितता किंवा बालकांचे शोषण यांपैकी नेमकी कोणती कारणे आहेत, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे ॲड. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
गुंगीकारक पदार्थ दिल्याच्या आरोपांची चौकशी करा!
निवेदनातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे काही लहान बालकांना गुंगी आणणारे पदार्थ दिले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. काही बालकांच्या डोक्याच्या टाळूवर अफूसारखा पदार्थ लावला जात असल्याच्या तक्रारीही निवेदनात नमूद आहेत. तसेच काही बालकांना इतर व्यक्तींकडून भिक्षा मागण्यासाठी आणले जात असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, हे आरोप अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे संबंधित बालकांची वैद्यकीय तपासणी, त्यांच्या सुरक्षिततेची खात्री आणि पोलिसांसह बालसंरक्षण यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बालकांना संरक्षण आणि शिक्षण मिळावे!
बालभिक्षावृत्तीचा प्रश्न केवळ मंदिर परिसरापुरता मर्यादित नसून, तो बालकांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता आणि मूलभूत अधिकार यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून बालकांचे संभाव्य शोषण रोखावे, गरजू कुटुंबांना मदत उपलब्ध करून द्यावी आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलावीत, असे निवेदनात म्हटले आहे.
महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी विनंती ॲड. स्वाती शिंदे यांनी केली आहे.
“चिमुकल्यांच्या हातात भिक्षेचे पात्र नको, शिक्षणाची पुस्तके हवीत!” या भावनेतून बालभिक्षावृत्ती रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
0
8
5
6
2
0



