Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पावसाच्या खंड पडल्याने खरीप उद्ध्वस्त; शास्त्रज्ञांच्या पथकाकडून शेतशिवारात नुकसानीची पाहणी!

राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत तेरखेडा, इटकळ येथे वस्तुनिष्ठ पाहणी; आठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल शासनाकडे जाणार

0 8 5 6 2 6

पावसाच्या खंड पडल्याने खरीप उद्ध्वस्त; शास्त्रज्ञांच्या पथकाकडून शेतशिवारात नुकसानीची पाहणी!

राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत तेरखेडा, इटकळ येथे वस्तुनिष्ठ पाहणी; आठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल शासनाकडे जाणार

धाराशिव : प्रतिनिधी

पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिकांना बसलेल्या तडाख्याची शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून ठोस मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने महसूल व कृषी यंत्रणेला तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी वाशी तालुक्यातील तेरखेडा तसेच तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरातील शेतशिवारात नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

शेतातील पीक पाहणीपासून संभाव्य उत्पादनातील घट निश्चित करण्यापर्यंत प्रत्येक बाबीची नोंद घेण्यात आली असून, आठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल शासनाकडे सादर होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान? मदतीचा मार्ग मोकळा होणार!

शास्त्रज्ञ, कृषी विभागातील तज्ज्ञ आणि महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून पावसातील खंडाचा पिकांवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती, नुकसानीची तीव्रता आणि संभाव्य उत्पादनातील घट याची पाहणी केली.

नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे पाहणीत स्पष्ट झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषांनुसार मदत मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळू शकते. त्यामुळे तयार होणाऱ्या अहवालाकडे आपले वैयक्तिक लक्ष असून, तो वेळेत शासनाकडे सादर होण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

पीक काढण्याआधी कृषी विभागाशी संपर्क साधा!

जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात प्रत्येक पिकासाठी पीक कापणी प्रयोगाचे १२ प्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. या प्लॉटची माहिती संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे.

त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांची कापणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून आपल्या गावातील निश्चित प्लॉटची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑक्टोबरची वाट कशाला? पीक कापणी प्रयोग सप्टेंबरमध्येच घ्या!

नुकसानग्रस्त पीक अधिक काळ शेतात ठेवणे शेतकऱ्यांना शक्य नसून, अनेक शेतकऱ्यांनी पीक काढण्यास सुरुवात केली आहे. धाराशिव जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग ऑक्टोबरमध्ये प्रस्तावित आहेत. मात्र, तोपर्यंत नुकसानग्रस्त शेतातील पीकच उपलब्ध राहणार नसल्याची शक्यता आहे.

 

अशा परिस्थितीत निश्चित केलेल्या प्लॉटवर पीक उपलब्ध नसल्यास प्रत्यक्ष उत्पादनातील घट निश्चित करण्यात अडचणी निर्माण होऊन पात्र शेतकरी पीकविमा अथवा शासनाच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची भीती आहे.

ही बाब लक्षात घेऊन पीक कापणी प्रयोग ऑक्टोबरऐवजी सप्टेंबरमध्येच घेण्यात यावेत, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी आयुक्तांकडे केली आहे. कृषी आयुक्तांनी महसूल विभाग आणि संबंधित विमा कंपन्यांशी तातडीने चर्चा करून सप्टेंबरमध्येच पीक कापणी प्रयोग घेण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतशिवारात तज्ज्ञांचे पथक उतरले!

तेरखेडा येथील पाहणीमध्ये कृषी विस्तार विद्यावेत्ता, आंबेजोगाई येथील सदस्य तथा शास्त्रज्ञ डॉ. अरुण गुट्टे, आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ डॉ. हेमंत बेलसरे, डॉ. गोपाळ चव्हाण, असीम रामा परवीन, तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोलंगे, वाशीचे तालुका कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी सहभागी झाले होते.

इटकळ येथील पाहणीत उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोलंगे, आयआयटी मुंबईचे आकाश राठोड व त्यांचे तज्ज्ञ पथक, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे शास्त्रज्ञ एस. एल. सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी के. जे. बचुटे, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, प्रा. ए. बी. कसबे, डॉ. एस. एन. झगडे, शास्त्रज्ञ पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, एन. एस. हरवाडीकर, दयानंद गळवे आदी सहभागी झाले.

तेरखेडा येथे सुधीर घोलप, प्रवीण घुले, प्रभाकर सारूक, अरुण धालगडे, मदन बारकुल, आदेश घुले यांच्यासह शेतकरी बालाजी घुले, मंगेश कडवकर, शिवाजी धुमाळ, बाबासाहेब घुले, उमाकांत मनगिरे, रुपेश उमरदंड उपस्थित होते.

इटकळ येथे जि.प. सभापती सिद्धू अण्णा कोरे, पं.स. सभापती विक्रम देशमुख, बा.स. सभापती संतोष बोबडे, वसंतराव वडगावे, अरविंद पाटील, महादेव जाधव, रमेश पाटील, मल्लिनाथ गावडे, विलास राठोड, पद्माकर जेवळे उपस्थित होते.

‘नुकसानभरपाई मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच!’

खरीप नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल वेळेत शासनाकडे सादर होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार, अशी ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

पावसाच्या खंडाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला असताना आता शास्त्रीय पाहणीच्या अहवालातून नुकसान किती ठरते आणि शासनाच्या मदतीचा हात शेतकऱ्यांपर्यंत किती वेगाने पोहोचतो, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे