ब्रेकिंगमहाराष्ट्र
‘ मनोज जरांगें पाटलांना’ आंदोलनाची परवानगी नाकारता, मग मुक्ती संग्राम दिन कसला?
१७ सप्टेंबरच्या ध्वजारोहणाला अखंड मराठा समाजाचा विरोध; पालकमंत्र्यांऐवजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची मागणी

0
8
5
6
2
6
‘ मनोज जरांगें पाटलांना’ आंदोलनाची परवानगी नाकारता, मग मुक्ती संग्राम दिन कसला?
१७ सप्टेंबरच्या ध्वजारोहणाला अखंड मराठा समाजाचा विरोध; पालकमंत्र्यांऐवजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची मागणी
धाराशिव | प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ अखंड मराठा समाज, धाराशिव जिल्ह्याने आता थेट प्रशासनाला इशारा दिला आहे. दि. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमास विरोध नोंदविण्यात येणार असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोजदादा जरांगे पाटील हे लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यासाठी मुंबईकडे जात आहेत. मात्र, त्यांच्या आंदोलनाला शासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्याची बाब समोर आल्याने धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे अखंड मराठा समाजाने म्हटले आहे.

◾‘लोकशाहीचा ध्वज फडकवायचा अन् आंदोलनाचा आवाज दाबायचा?’
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणे हा लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांचा अधिकार असल्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. त्यामुळे एका बाजूला स्वातंत्र्य, लोकशाही आणि मुक्तीसंग्रामाचा इतिहास सांगत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करायचा आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन करू इच्छिणाऱ्या समाजाच्या नेतृत्वाला परवानगी नाकारायची, ही विसंगती असल्याचा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
या भूमिकेचा निषेध करत दि. १७ सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमास विरोध करण्याचा निर्णय अखंड मराठा समाजाने जाहीर केला आहे.
◾स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते ध्वजारोहणाची मागणी
पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण न करता धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अथवा त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
मराठवाड्याच्या मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा योग्य सन्मान व्हावा आणि लोकशाही मूल्यांप्रती प्रशासनाची बांधिलकी अधोरेखित व्हावी, यासाठी ही मागणी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
◾‘आंदोलनाचा मार्ग खुला ठेवा!’
मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातील परवानगीचा प्रश्न शासनाने गांभीर्याने विचारात घ्यावा आणि शांततामय व संविधानिक आंदोलनाचा मार्ग खुला ठेवावा, अशी मागणीही अखंड मराठा समाजाने केली आहे.
दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये मराठा समाजाची भूमिका आणि प्रशासनाची पुढील पावले याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0
8
5
6
2
6



