Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पिंक पथकाच्या ‘कराटे’ने विद्यार्थिनींचा आत्मविश्वास दणाणला!

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील १५० विद्यार्थिनींना मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण; पोलीस मुख्यालयातील विविध शाखांची घेतली प्रत्यक्ष माहिती

0 8 5 6 3 0

पिंक पथकाच्या ‘कराटे’ने विद्यार्थिनींचा आत्मविश्वास दणाणला!

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील १५० विद्यार्थिनींना मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण; पोलीस मुख्यालयातील विविध शाखांची घेतली प्रत्यक्ष माहिती

धाराशिव : प्रतिनिधी

महिला सक्षमीकरणासोबतच विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षणाचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी धाराशिव पोलिसांच्या पिंक पथकाने पुढाकार घेतला आहे. पिंक पथक, उपविभाग धाराशिवचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. बनसोडे यांच्या पुढाकारातून रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील विद्यार्थिनींना गेल्या महिनाभरापासून मोफत कराटे प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण होऊन आत्मविश्वासाला बळ मिळत आहे.

स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करून कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जाण्याची तयारी विद्यार्थिनींमध्ये निर्माण व्हावी, हा या प्रशिक्षणामागील मुख्य उद्देश आहे. ‘स्वतःचे रक्षण स्वतः करा’ हा संदेश देत पिंक पथकाकडून विद्यार्थिनींना विविध प्रकारचे स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जात आहे.

१५० विद्यार्थिनींची पोलीस मुख्यालयाला भेट!

या उपक्रमाचा एक भाग म्हणून रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या उपप्राचार्य दाबके मॅडम, प्राध्यापिका आणि सुमारे १५० विद्यार्थिनींनी धाराशिव पोलीस मुख्यालयाला भेट दिली. यावेळी विद्यार्थिनींना पोलिसांच्या विविध शाखांचे कामकाज प्रत्यक्ष समजावून सांगण्यात आले.

विद्यार्थिनींनी पोलीस नियंत्रण कक्ष, भरोसा कक्ष, मानव तस्करीविरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंक पथक या शाखांना भेट देऊन त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. संबंधित अधिकारी व शाखाप्रमुखांनी नागरिकांच्या तक्रारी हाताळण्याची पद्धत, महिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच गुन्ह्यांच्या तपासाची कार्यपद्धती याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

संकटात घाबरू नका; थेट ११२ वर संपर्क साधा!

आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोलीस मदत मिळविण्यासाठी ‘डायल ११२’ या क्रमांकाचा वापर करता येतो, याबाबतही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा आणि स्वतःच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी केले.

महिलांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत सजग राहावे, अडचणीच्या प्रसंगी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा आणि आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.

पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक

हा उपक्रम पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. बनसोडे, पोलीस हवालदार संदीप सुरवसे, महिला पोलीस नाईक मुक्ता लोखंडे तसेच चालक लाटे उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती जाधव, सहसमन्वयक शिल्पा डोळे तसेच अंतर्गत निवारण समितीच्या प्रमुख डॉ. छाया दापके यांच्या उपस्थितीत ही शैक्षणिक भेट पार पडली.

मोफत कराटे प्रशिक्षण, पोलिसांच्या विविध शाखांची प्रत्यक्ष ओळख आणि संकटसमयी उपलब्ध असलेल्या पोलीस मदतीची माहिती, या तिन्हींचा संगम साधणारा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी आत्मविश्वास वाढविणारा ठरत आहे. पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एस. जी. बनसोडे यांच्या पुढाकाराचे पालक, विद्यार्थिनी आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे