Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

धाराशिवच्या आठही तालुक्यांत दुष्काळाचे सावट; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा!

चारा डेपो, टँकर आणि रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य; खरीप नुकसानीनंतर लवकरच पीकविम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न – आमदार राणाजगजितसिंह पाटील

0 8 5 6 3 0

धाराशिवच्या आठही तालुक्यांत दुष्काळाचे सावट; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा!

चारा डेपो, टँकर आणि रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य; खरीप नुकसानीनंतर लवकरच पीकविम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव | तुळजापूरनामा

पावसाने पाठ फिरवल्याने धाराशिव जिल्ह्यातील बळीराजासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आठही तालुक्यांमध्ये पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली असून, जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक तांत्रिक बाबींचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

धाराशिव तालुक्यातील उपळा शिवारात ग्रामस्थ व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या घोंगडी बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार पाटील यांनी शेतशिवारात प्रत्यक्ष जाऊन पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी केली.

“शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभा हंगाम करपताना शासनाने कागदोपत्री प्रक्रियेत वेळ घालवू नये; प्रत्यक्ष मदत बांधावर पोहोचली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

शास्त्रज्ञांच्या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी

जिल्ह्यातील खरीप पिकांच्या गंभीर परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा शासनासमोर मांडण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील वरिष्ठ तज्ज्ञ, महसूल आणि कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष शिवारात पाहणी करून पीकस्थितीची नोंद केली आहे. या पाहणीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

या अहवालामध्ये पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड आणि संभाव्य नुकसानीबाबत वस्तुनिष्ठ माहिती नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी पंचनामे आणि नुकसानभरपाई निश्चित करताना या तांत्रिक माहितीचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उपलब्ध सरकारी अहवालांनुसार धाराशिवमध्ये पावसाची मोठी तूट असून खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; टँकरचे नियोजन

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ज्या भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, तेथे तातडीने टँकरची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येत आहे.

पावसाअभावी पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनावरे वाचविण्यासाठी चारा डेपो सुरू करण्याची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली असून, गरजेनुसार तातडीने निर्णय घेतला जाईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये पाणीसाठा अत्यल्प असल्याने पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाचा प्रशासनाने आतापासूनच सामना करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनीही दिले आहेत.

रोजगार हमीच्या कामांना गती देणार

पावसाअभावी शेतीचे उत्पन्न धोक्यात आल्याने ग्रामीण कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या कुटुंबांना हाताला काम मिळावे आणि चरितार्थासाठी आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रत्येक गावात रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

खरीप मदतीनंतर पीकविम्यासाठीही पाठपुरावा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रथम खरीप नुकसानीचे अनुदान तातडीने मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असून त्यानंतर पीकविम्याची भरपाई मिळवून देण्यासाठीही पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे नुकसानग्रस्त पिकांबाबत सप्टेंबरमध्येच पीक कापणी प्रयोग घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही यापूर्वी समोर आली आहे.

दुष्काळाचे संकट केवळ शेतापुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम पाणी, पशुधन, रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार असल्याने प्रशासनासमोर आता तातडीच्या उपाययोजनांचे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळते, याकडे धाराशिव जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

तुळजापूरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 5 6 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे