ब्रेकिंगमहाराष्ट्र
सामाईक बोरवेलच्या वादाचा रक्तरंजित शेवट; कार्ल्यात ब्रम्हदेव मोटे यांचा निर्घृण खून, मुलावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
चारही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी

0
7
6
4
9
7
सामाईक बोरवेलच्या वादाचा रक्तरंजित शेवट; कार्ल्यात ब्रम्हदेव मोटे यांचा निर्घृण खून, मुलावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
चारही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील कार्ला गावात सामाईक बोरवेलच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित संघर्षात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ब्रम्हदेव बब्रुवान मोटे (वय ५५) यांचा निर्घृण खून झाला असून त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या मुलावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे कार्ला गावासह संपूर्ण परिसरात भीती, संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
नळदुर्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक २१०/२०२६ अंतर्गत खून, खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महेश ब्रम्हदेव मोटे (वय २५, रा. कार्ला) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ मे रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर ही घटना घडली. सामाईक बोरवेलमधील मोटार विचारणा न करता का काढली, या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला होता. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची असलेला वाद काही क्षणांतच उग्र झाला.फिर्यादीचे वडील ब्रम्हदेव मोटे हे संबंधितांकडे जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांच्या डोक्यावर, छातीवर आणि पोटावर लोखंडी पाईप व काठ्यांनी गंभीर मारहाण केली. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वडिलांना वाचवण्यासाठी महेश मोटे पुढे सरसावले असता आरोपी विष्णू बब्रुवान मोटे याने त्यांच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच इतर काही व्यक्तींनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
➤ विष्णू बब्रुवान मोटे
➤ गौतम बब्रुवान मोटे
➤ योगेश गौतम मोटे
➤ मनोज गौतम मोटे
(सर्व रा. कार्ला, ता. तुळजापूर, जि. धाराशिव)
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख,प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक मेघना आय. एन.,सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळंके,सहाय्यक पोलीस निरीक्षक कांगुणे तसेच पोलीस उपनिरीक्षक व तपास अधिकारी गित्ते यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली.तपासादरम्यान आरोपी त्यांच्या राहत्या घरी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना ताब्यात घेतले.यानंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे, लोखंडी पाईप, कोयता तसेच इतर महत्त्वाच्या वस्तू जप्त करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती.सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे.
0
7
6
4
9
7



