दिवाळीत तुळजाभवानी दर्शनासाठी प्रचंड गर्दी; पार्किंग ठिकाणी चिखल, वसुली मात्र तुफान;प्रशासन मौनधारणेच्या भूमिकेत!
भाविकांची गर्दी वाढली की ठेकेदारांची लूट वाढली — दिवाळीत प्रशासनाची खरी परीक्षा!
दिवाळीत तुळजाभवानी दर्शनासाठी प्रचंड गर्दी; पार्किंग ठिकाणी चिखल, वसुली मात्र तुफान;प्रशासन मौनधारणेच्या भूमिकेत!
भाविकांची गर्दी वाढली की ठेकेदारांची लूट वाढली — दिवाळीत प्रशासनाची खरी परीक्षा!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी तुळजापूर नगरी गजबजून गेली आहे. मात्र या गर्दीच्या संधीचा फायदा घेत पार्किंग ठेकेदारांकडून भाविकांची सर्रास लूट सुरू असून, प्रशासनाकडून त्याकडे ‘डोळेझाक’ केल्याचा आरोप होत आहे!
शारदीय नवरात्रातही एवढी गर्दी नव्हती, पण दिवाळीत दर्शनासाठी भाविकांचा प्रचंड ओघ वाढल्याने शहरातील सर्व वाहनतळे अक्षरशः तुडुंब भरली आहेत. पालिकेच्या पार्किंगसह खासगी पार्किंग ठिकाणी गाड्यांची रांग लागली असून अनेक ठिकाणी चिखल, पाणी व कोणतीही सुविधा नसतानाही ठेकेदारांकडून शंभर ते दोनशे रुपये आकारले जात असल्याचे समोर आले आहे.
हडको मैदान, तालुका क्रीडा अधिकारी मैदान येथे भाविकांची वाहने अक्षरशः चिखलात बुडालेली असताना, कोणत्याही मूलभूत सुविधा न देता मनमानी वसुली सुरू असल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

दरम्यान, तुळजापूर येथील रविंद्र ज्ञानोबा साळुंके यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे दिलेल्या लेखी निवेदनात गंभीर आरोप करत म्हटले आहे की —
◾“पूर्वीच्या दोन ठेकेदारांकडे पन्नास लाख ते एक कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. तरी चालू ठेकेदाराच्या मालमत्तेवर बोजा टाकावा, मॉर्गेज घ्यावी आणि भाविकांची होणारी आर्थिक लूट तात्काळ थांबवावी.”
भाविकांच्या अडचणी, वाहतूक कोंडी आणि अव्यवस्थित वाहनतळ व्यवस्थेमुळे तुळजापूर शहरात गोंधळाचे वातावरण आहे. शिवाजी चौक, वडार गल्ली, बसस्थानक परिसरात वाहनांची कोंडी झाल्याने पोलिस प्रशासनावरही ताण वाढला आहे.
प्रशासन मात्र “सर्व नियंत्रणात आहे” असे सांगत असल्याने भाविकांत संताप आहे.
◾“शारदीय नवरात्रात नव्हे, खरी परीक्षा दिवाळीत सुरू झाली आहे!” — असे बोलले जाणे सध्या तुळजापूरच्या प्रत्येक चौकात ऐकू येते.




