ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
श्री तुळजाभवानी मंदिर व शहरविकास ; पुजारी मंडळाचे उमेदवारांना आठ मुद्द्यांचे आव्हान!
. “तुळजापूर विकासावर भूमिका स्पष्ट करा; पुजारी मंडळाचे नगराध्यक्ष उमेदवारांना ८ मुद्द्यांचे अल्टीमेटम!”
0
7
6
5
0
5
श्री तुळजाभवानी मंदिर व शहरविकास ; पुजारी मंडळाचे उमेदवारांना आठ मुद्द्यांचे आव्हान!
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर नगर परिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्रातील स्थानिक पुजारी बांधवांनी नगराध्यक्ष पदाच्या सर्व उमेदवारांसमोर आपल्या सर्वसमावेशक मागण्या लेखी स्वरूपात मांडत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर परिसर विकास, धार्मिक पारंपरिक हक्क, भक्तांच्या सेवासुविधा आणि शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात मांडण्यात आलेल्या ८ प्रमुख मुद्द्यांवर उमेदवारांनी जाहिरनाम्यात ठोस भूमिका जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
शहराच्या पश्चिम भागापुरता विकास आराखडा मर्यादित नको – तीव्र विरोध कायम
अंदाजे १८०० कोटींच्या प्रस्तावित मंदिर व परिसर विकास आराखड्याचा लाभ फक्त पश्चिम भागापुरता मर्यादित करण्यास पुजारी बांधवांचा ठाम विरोध कायम आहे.
शहराचा सर्वांगीण आणि समतोल विकास व्हावा, रामदरा तलाव–आराधवाडी भागात एकतर्फी विकास टाळावा, अशी मागणी पुन्हा अधोरेखित करण्यात आली.
पंचामृत अभिषेक–सिंहासन पूजेची वेळ वाढवावी; पाससाठी आधुनिक लॉगिन प्रणालीची मागणी
भक्तांच्या वाढत्या संख्येचा विचार करून पंचामृत अभिषेक व सिंहासन पूजेच्या वेळा आणि संख्या वाढवाव्यात, तसेच पास नोंदणीसाठी अत्याधुनिक लॉगिन यंत्रणा राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुजारी बांधवांचे हक्क, सेवा व सुविधा कायम राहाव्यात
मंदिरातील पारंपरिक पुजाविधी, कुलधर्म–कुलाचार यांचा सन्मान राखत पुजारी बांधवांची सेवा अखंडित सुरू ठेवण्यासाठी पुढील सुविधा देण्याची मागणी :
• आराध्य सेवा रूम
• पुजारी विश्रांती कक्ष
• पुजारी लॉकर रूम
• हक्कदारांना मंदिर परिसरात स्वतंत्र रूम
धार्मिक साहित्य विक्रीसाठी जागा; रांगा आरक्षित करण्याची मागणी
मंदिर विकास आराखड्यात पूजेच्या रांगा आरक्षित करण्यात याव्यात तसेच धार्मिक साहित्य विक्रीसाठी पुजारी व स्थानिकांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सेवेकरी–पुजारी बांधवांसाठी उत्पन्नवाढ, वैद्यकीय विमा संरक्षणाची मागणी
सेवेकरी व पुजारी बांधवांचे उत्पन्न स्थिर व वाढते राहण्यासाठी धोरणात्मक निर्णय, तसेच वैद्यकीय विमा संरक्षण जाहीर करण्याची मागणी सर्व उमेदवारांकडे करण्यात आली आहे.
भक्तांच्या सोयी अन् पारदर्शक कारभाराची मागणी
भक्तांसाठीच्या मुलभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था असल्याचे नमूद करून-
• स्वच्छता
• पिण्याचे पाणी
• दर्शन व्यवस्था
• पारदर्शक कारभार
• गैरव्यवहारावर तात्काळ कारवाई
• विश्वस्त बैठकीत पुजारी मंडळाचा सहभाग
याबाबत लेखी हमी देण्याची मागणी उमेदवारांसमोर ठेवली गेली.
विकास आराखड्याचे शहरातील व्यापारी–फेरीवाले–लॉज धारकांवर दुष्परिणाम; स्पष्ट भूमिका मागितली
एकतर्फी विकास आराखड्यामुळे शहरातील
• छोटे व्यापारी
• फेरीवाले
• लॉज व भक्तनिवासधारक
• पुजारी
• स्थानिक नागरिक
यांच्या आर्थिक आणि पारंपरिक उपजीविकेला धोका निर्माण होतो, असा आरोप करत उमेदवारांची स्पष्ट, निर्भीड भूमिका लेखी स्वरूपात जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
नगरपालिकेच्या मूलभूत सेवांबाबत तीव्र नाराजी
शहरात—
• स्वच्छता
• पाणीपुरवठा
• पार्किंग व्यवस्था
• स्ट्रीटलाईट
• कचरा व्यवस्थापन
• नाली–ड्रेनेज स्वच्छता
• यात्रा नियोजन
यांच्या अकार्यक्षम व्यवस्थेमुळे तुळजापूरची प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद करून कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली.
जाहीरनाम्यात समावेश व लेखी हमी दिल्यास सर्व पुजारी बांधवांना माहिती दिली जाणार
पुजारी मंडळाचे म्हणणे आहे की
“उमेदवाराने या पुरोगामी मागण्यांना जाहीरनाम्यात स्थान देऊन लेखी हमी दिल्यास आम्ही ती माहिती सर्व पुजारी बांधवांपर्यंत पोहोचवू.”नगराध्यक्ष पदाच्या सर्व उमेदवारांसमोर हे पत्र औपचारिकरित्या सादर करण्यात आले असून, आता कोण उमेदवार या मागण्यांवर ठोस भूमिका जाहीर करतो याकडे संपूर्ण तिर्थ श्रीक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

0
7
6
5
0
5



