ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
राज्यात निवडणुकीचा बिगुल! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान, ११ डिसेंबरला मतमोजणीची शक्यता
संपादक : ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर
0
7
6
4
9
6
राज्यात निवडणुकीचा बिगुल! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान, ११ डिसेंबरला मतमोजणीची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील आठवड्यातच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून, आठवडाभरात आचारसंहिता लागू होईल, अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ किंवा ६ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या, तसेच २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगर पंचायतींच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. ३ किंवा ४ डिसेंबर रोजी नगरपरिषद-नगरपंचायतींसाठी मतदान, तर ८ किंवा ९ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. या दोन्हींची मतमोजणी ११ डिसेंबर रोजी पार पडेल.
▪️आयोगाची तयारी पूर्ण
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांचा सखोल आढावा घेण्यात आला असून, राज्य सरकारने आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. आयोगाने सर्व निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याची रूपरेषा आखली आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडतील. तर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल.
▪️११ जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण
आयोगाच्या सूत्रांनुसार, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ११ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण केला जाणार आहे. निवडणुका पार पाडण्यासाठी त्रिस्तरीय योजना तयार करण्यात आली असून, प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि निवडणूक अधिकारी सज्ज आहेत.
दरम्यान, निवडणूक जाहीर होण्याच्या हालचालींमुळे सर्वच पक्षांमध्ये उत्साह आणि हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांची तयारीही पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.

▪️ राज्यातील लोकशाहीचा उत्सव आता दारातच – सज्ज व्हा मतदानासाठी!
✍️ संपादक : ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर
0
7
6
4
9
6



