ब्रेकिंगमहाराष्ट्र
निर्घृण खून खटल्यात मोठा ट्विस्ट; दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता!
पाच वर्षे न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना दिलासा; बचाव पक्षाच्या युक्तिवादाने तपासातील त्रुटींवर उपस्थित केले प्रश्न

0
8
5
6
3
0
निर्घृण खून खटल्यात मोठा ट्विस्ट; दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता!
पाच वर्षे न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना दिलासा; बचाव पक्षाच्या युक्तिवादाने तपासातील त्रुटींवर उपस्थित केले प्रश्न
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीत सन २०२१ मध्ये घडलेल्या निर्घृण खून प्रकरणातील दोन्ही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तब्बल पाच वर्षे न्यायालयीन खटला भोगल्यानंतर आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोपींच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी बाजू मांडली.
तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११३/२०२१ अन्वये प्रकरण दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सदर प्रकरण एस.सी. क्रमांक ५७/२०२१ म्हणून न्यायालयात चालले. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, २०१, १२०(ब) सह ३४ अन्वये दोषारोप ठेवण्यात आले होते.
बंदुकीच्या व्यवहारातून खुनाचा आरोप
अभियोगानुसार, मयत व्यक्तीला बंदूक खरेदी करण्यासाठी आरोपींनी पैसे दिले होते. मात्र मयताने बंदूक उपलब्ध करून न दिल्याच्या कारणातून वाद निर्माण झाल्याचा आरोप होता. त्यानंतर कोयता व गुप्तीने मयताच्या गळ्यावर आणि पोटावर वार करून त्याचा खून केल्याचा आरोप आरोपींवर ठेवण्यात आला होता.
घटनेच्या दिवशी मयत कामावरून परतल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास आरोपींना भेटण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रिक्षातून दारू खरेदी करून आरोपी व मयत अज्ञात ठिकाणी गेल्याची हकीकत तपासात समोर आल्याचे नमूद करण्यात आले होते. पुढे अज्ञात ठिकाणी मयताचा खून झाल्याचे समोर आले होते.
‘प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कुठे?’ बचाव पक्षाचा सवाल
बचाव पक्षातर्फे ॲड. विशाल साखरे यांनी सरकार पक्षाच्या पुराव्याची कसून उलटतपासणी केली. फिर्यादीने प्रत्यक्ष घटना पाहिलेली नाही, घटनास्थळ निर्जन होते आणि खून होताना पाहिलेला कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, असा महत्त्वाचा युक्तिवाद करण्यात आला.
तसेच आरोपींना अटक करताना अटकेची कारणे सांगण्यात आली का, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले का, यासह तपास प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
पंचनामे, वैद्यकीय व फॉरेन्सिक पुराव्यांवरही प्रश्नचिन्ह
जप्ती पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, कपडे जप्ती पंचनामा तसेच अन्य पंचनाम्यांमध्ये तपास यंत्रणेकडून त्रुटी राहिल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
रिक्षाचालक, बारमधील साक्षीदार आणि पानटपरी चालक यांच्या साक्षी सरकार पक्षाच्या प्रकरणाला अपेक्षित बळकटी देत नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मयताचा खून आरोपींनीच केला, हे सिद्ध करणारा प्रत्यक्षदर्शी पुरावा उपलब्ध नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला.
‘डॉग स्कॉड’च्या तपासालाही उलटतपासणीचा धक्का
तपासादरम्यान पोलिसांनी श्वान पथकाचा वापर करून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ॲड. विशाल साखरे यांनी उलटतपासणीदरम्यान या तपास प्रक्रियेबाबत साक्षीदारांना प्रश्नांच्या माध्यमातून जाब विचारला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही उलटतपासणी करून आरोपींनी गुन्हा केल्याचा दावा सिद्ध होत नसल्याचे बचाव पक्षाने मांडले. पोलिस तपास, पंचनामे, वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि तपास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर बचाव पक्षाने जोर दिला.
‘अज्ञात व्यक्तींनी खून केला असावा’ हा बचाव ग्राह्य
ॲड. विशाल साखरे यांनी मयताचा खून अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणास्तव केला असावा, असा बचाव घेतला. तपासामध्ये अनेक त्रुटी असल्याचा युक्तिवाद करत सरकार पक्षाच्या साक्षीदारांची कसून उलटतपासणी करण्यात आली.
बचाव पक्षाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. खोमणे साहेब यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या खून खटल्यात न्यायालयाच्या निर्णयामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणात ॲड.विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा विशाल साखरे,ॲड.महेश लोहार,ॲड. शुभम तांबे,ॲड. अमित गोळे,ॲड .आकाश,ॲड. संकेत गोरे,ॲड.ओंकार कोरेगावकर,ॲड.अर्चना कांबळे, ॲड.लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड . रोहित लोमटे आणि ॲड. पृथ्वीराज खोचरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
0
8
5
6
3
0



